धुळे - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे शहरात भाजप-शिवसेना युतीला भगदाड पडले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मधील नगरसेवकांनी अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच भाजपचे अन्य नगरसेवकही राजवर्धन कदमबांडे यांचा प्रचार करत आहेत. भाजपाच्या या भूमिकेमुळे शहरातील भाजप शिवसेना युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा - धुळे : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरीश पटेल यांचा भाजप प्रवेश
विधानसभा निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने अनिल गोटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तर शिवसेना भाजप युतीकडून हिलाल माळी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संपूर्ण राज्यात भाजप शिवसेना युती झाली असताना धुळे शहरात मात्र, युतीत काहीतरी बिनसलयाची चर्चा आहे. शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांचा भाजपचे काही ठराविक कार्यकर्ते हे प्रचार करत आहे. मात्र, शहराचे महापौर आणि त्यांचे चिरंजीव तसेच राष्ट्रवादीतून भाजपात आलेले आणि महापालिकेच्या निवडणुकीत विजय झालेले काही नगरसेवक हिलाल माळी यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग न घेता राजवर्धन कदमबांडे यांचा प्रचार करताना दिसत आहे.
हेही वाचा - युतीचे पैलवान अंगाला तेल लावून बसलेत, मात्र मैदानात कोणीची नाही - मुख्यमंत्री
दरम्यान, प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मधली नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी राजवर्धन कदमबांडे यांना नुकताच पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे शहरात महायुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.