धुळे - धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांमध्ये भाजपचा वरचष्मा दिसून आला. जिल्ह्यातील 218 पैकी जवळपास शंभर ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यामध्ये भाजपने एक हाती ग्रामपंचायतींवर विजय मिळवलाचा दावा केला आहे. शिवसेनेने देखील जिल्ह्यात चांगली मुसंडी मारली आहे. धुळे तालुक्यामध्ये काँग्रेसने वर्चस्व राखला आहे. तर साक्री तालुक्यात महाविकास आघाडीला मतदारांनी कौल दिला आहे. साक्री तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना होता. यात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे दिसून आले. भाजपने साक्री तालुक्यात अनके ठिकणी वर्चस्व सिद्ध केले.
शिंदखेडा तालुक्यात आमदार जयकुमार रावल यांचे वर्चस्व कायम-
शिंदखेडा तालुक्यामध्ये भाजप आमदार व माजी मंत्री जयकुमार रावल यांनी आपलं वर्चस्व कायम राखले आहे. त्यांच्या मतदारसंघातील एकूण 69 पैकी 50 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. तर अकरा जागांवर शिवसेनेचा विजय झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही चांगला जोर लावला होता.
धुळे तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा-
धुळे तालुक्यात काँग्रेसने पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केले आहे. तालुक्यातील 72 पैकी 40 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तर शिवसेनेनेही पंधरापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजय मिळवण्याचा दावा केला आहे. भाजपने अनेक ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेत, यश मिळवले आहे. धुळे तालुक्यातल्या मोठ्या ग्रामपंचायतींवर काँग्रेसने वर्चस्व मिळवला आहे.
आमदार अमरीश पटेल यांचे वर्चस्व कायम-
शिरपूर तालुक्यातल्या 34 पैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपाने आपली सत्ता कायम राखली आहे. तर राष्ट्रवादीनेही चांगली मुसंडी मारत, 9 ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा दावा केला आहे. या ठिकाणी 25 च्या जवळपास ग्रामपंचायती या भाजपने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती नंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपचा बोलबाला शिरपूर तालुक्यात पाहायला मिळतोय. तालुक्यातील जनतेने विकासाला कौल दिल्याचा दावा आमदार अमरीश पटेल यांनी केला आहे.
साक्री तालुक्यात अनोखा जल्लोष-
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा अनोखा विजय जल्लोष पाहायला मिळाला. याठिकाणी मालपूर ग्रामपंचायत मध्ये खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे भाऊ सुरेश सोनवणे यांचे पॅनल विजयी झाल्यानंतर जेसीबीतून गुलाल उधळण्यात आला. दुसरीकडे उत्साही कार्यकर्त्यांना काही ठिकाणी पोलिसांच्या कठोर भूमिकेचा सामना करावा लागला. वाहतुकीला अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांना साक्री येथे मोठी कसरत करावी लागली.
हेही वाचा- नागपूर ग्रामपंचायत निवडणुकीत 'महाविकास आघाडी'चे वर्चस्व
हेही वाचा- मुंबईत मंगळवारपासून लसीकरण पुन्हा होणार सुरू