धुळे - लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम घोटाळा करून सत्ता मिळवली. असा आरोप करत ईव्हीएम मशीन हटवावे, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम घोटाळा करून सत्ता मिळवली. लोकशाहीने प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून भाजपने लोकशाहीची गळचेपी करून सत्ता मिळवली आहे. यापुढील काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनचा वापर करण्यात येऊ नये, अशी मागणी करत भारिप बहुजन महासंघाच्यावतीने धुळे शहरातील क्यूमाईन क्लबसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. ईव्हीएम मशीनबाबत निवडणूक आयोगाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाने दिला आहे.