धुळे - कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. परंतु, जिल्ह्यातील शिरपूर जवळील थाळनेर येथील यमुनाबाई भिवा दखनी या (85) वृद्ध आजींना रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना एक सुखद धक्का मिळाला आहे. आजीबाईंच्या कर्ज मुक्ततेसाठी चक्क बँक अधिकारी रुग्णालयात पोहोचले आणि आजीबाईंच्या हाती कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र स्वाधीन केले.
एका बाजूला कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळताना अनेक अडचणी येत आहेत. नावे गहाळ होणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा याचा फटका बसत आहे. परंतु, शिरपूर जवळील थाळनेर या गावातील यमुनाबाई या वृद्ध महिलेस चक्क दवाखान्यामध्ये बँक अधिकाऱ्यांनी जाऊन कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र स्वाधीन केले.यमुनाबाई यांचा अपघात झाल्याने त्यांच्या पायात मोठी दुखापत झाली आहे. यासाठी यमुनाबाई यांच्यावर थाळनेर येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांना आधार प्रमाणिकरणासाठी संस्थेत जाणे शक्य झाले नाही. त्यांची अडचण लक्षात घेऊन धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी थेट रुग्णालयात जाऊन यमुनाबाईंच्या अंगठ्याचा नमुना घेऊन कर्जमुक्ती प्रमाणपत्र बहाल केले. २७ हजार रुपयांचे २ वर्षांपासून थकीत असलेले कर्ज माफ झाल्याचे पाहून यमुनाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. त्यांच्या कुटुंबाने शासनासह जिल्हा बँक व सोसायटीचे आभार मानले.
हेही वाचा - काळजी घ्या..! शेंगदाणे खाणे बेतले जीवावर, धुळ्यात तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
एरवी कर्जमुक्ती झाल्यानंतर देखील बँकेमध्ये काही ना काही कारणास्तव शेतकऱ्यांना बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. परंतु, शेतकऱ्यांच्या आयुष्यातली ही पहिलीच सुखद घटना असावी की, कर्जमुक्ती झाल्यानंतर बँक अधिकारी स्वतः दवाखान्यापर्यंत पोहोचून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्र स्वाधीन करावे.
हेही वाचा - डिजिटल युगाचा पुस्तक विक्री व्यवसायाला फटका... पुस्तकांचे वाचक घटले!