धुळे - संपूर्ण राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती अतिशय भीषण आहे. प्रदेश काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते विभागनिहाय दुष्काळ दौऱ्यावर आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मोरदड तांडा गावाला भेट घेऊन दुष्काळाची परिस्थिती जाणून घेतली. दुष्काळ हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
बाळासाहेब थोरात यांनी धुळे तालुक्यातील आर्वी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी येथील मोरदड तांडा गावातील नंदिनी पवार ही १३ वर्षीय मुलगी पाणी भरण्यासाठी गेली असताना तिचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला होता. तिच्या कुटुंबाला त्यांनी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी नंदिनीच्या कुटुंबाला काँग्रेसच्या वतीने २८ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
धरणातील पाणी साठा कमी झाला आहे. सरकारने आचरसंहितेचे कारण पुढे करून दुष्काळाकडे दुर्लक्ष केले आहे. अत्यंत भीषण परिस्थिती असून देखील सरकार त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, असे ते यावेळी म्हणाले.