धुळे - शहरातील मध्यवर्ती टपाल कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला,तर दुसऱ्या एका अधिकाऱ्यावर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता टपाल विभागाने शहरातील सर्व टपाल कार्यालये (टीएसओ-टाऊन सब ऑफीसेस) पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मध्यवर्ती कार्यालयाचा व्यवहार बंद करण्यात आला होता.
कोरोनाच्या अनुषंगाने कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीबाबत कार्यवाही होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पोस्ट मास्तर जनरल यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत कार्यवाहीची मागणी केली.
धुळे शहरातील मध्यवर्ती टपाल कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक कोरोनाबाधित निघाल्यानंतर इतर अधिकारी-कर्मचारी धास्तावले होते. त्यामुळे मध्यवर्ती टपाल कार्यालयाचा व्यवहार बंद केला होता.शहरातील इतर टपाल कार्यालये (टीएसओ) मात्र सुरू होती. दरम्यान,शुक्रवारी धुळे मध्यवर्ती टपाल कार्यालयाचेच वरिष्ठ प्रवर डाक अधीक्षकांचा "कोरोना'मुळे औरंगाबादला मृत्यू झाल्याची बातमी धडकली. मध्यवर्ती टपाल कार्यालय बंद असले तरी "टीएसओ'मधील कॅश जमा करणे व अनुषंगिक बाबींसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संपर्क इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांशी येतच होता. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या संघटनेनेही वरिष्ठांकडे याबाबत पत्रव्यवहार केला. याची दखल घेत विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून शहरातील टपाल विभागाचे कॅश ऑफिसेस/ "टीएसओ'देखील बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे.
धुळे सिटी पोस्ट ऑफिस (गल्ली नंबर-5), कलेक्टर पोस्ट ऑफिस (जुने कलेक्टर ऑफिस), स्टेशन रोड पोस्ट ऑफिस (हिरे मंगल कार्यालया जवळ),जयहिंद पोस्ट ऑफिस (विनोदनगर, वाडीभोकर रोड), विद्यानगरी पोस्ट ऑफिस (नगावबारी चौफुली), चैनी रोड पोस्ट ऑफिस, एसआरपी ग्रुप-६ (सुरत बायपास), मार्केटयार्ड पोस्ट ऑफिस (माधव कॉलनी), प्रमोदनगर पोस्ट ऑफिस (नकाणे रोड), एमआयडीसी पोस्ट ऑफिस (एमआयडीसी परिसर), मोहाडी लळिंग पोस्ट ऑफिस (बीएसएनएल कार्यालयाजवळ) व्यवहारही आता पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.
धुळे मध्यवर्ती टपाल कार्यालयातील अधिकारी कोरोनाबाधित निघाल्यानंतर इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कोरोनाच्या अनुषंगाने वैद्यकीय चाचणीबाबत पत्रव्यवहार करूनही कार्यवाही न झाल्याने पोस्ट मास्तर जनरल (औरंगाबाद विभाग) यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत याबाबत कार्यवाहीची मागणी केली. दरम्यान, पोस्ट मास्तर जनरल यांच्या पत्रानंतर आरोग्य यंत्रणेने मध्यवर्ती टपाल कार्यालयातील सहा जणांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले होते. मात्र, आजही त्यांचे नमुने घेतले गेले नसल्याचे समजते. सोमवारी त्यांना पुन्हा बोलावण्यात आले आहे.
टपाल विभागाने ८०-९० अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी दिली आहे. या यादीतून रॅण्डमली अधिकारी-कर्मचाऱ्यांना चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे. दरम्यान यापूर्वी चाचणी केलेल्या तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.