धुळे - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील युवतीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी द्यावी. पीडित तरुणीचे अंत्यसंस्कार कुटूंबीयांना माहिती न देता परस्पर मध्यरात्री करणाऱ्या पोलिसांवर व तपासी अधिकाऱ्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा. या घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय निवृत्त न्यायाधीशांकडे द्यावी आदि व अन्य मागण्यांसाठी आज धुळ्यात वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने सफाई आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
त्रिसदस्यीय समितीमध्ये किमान एका महिला न्यायाधीशांचा समावेश असावा. तसेच पीडित कुटूंबाचे पुर्नवसन महाराष्ट्रात करावे. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात उत्तर प्रदेशच्या बाहेर चालवावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
धुळे शहरातील संतोषी माता चौक ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात धुळे शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पीडित तरूणीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशी द्या, योगी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
काय आहेत मागण्या
- हाथरस येथील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करावी
- महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलावी
- हाथरस घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा
- पीडितेवर मध्यरात्री अंत्यसंस्कार करणाऱ्या पोलिसांवर व तपासी अधिकाऱ्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा.
- या घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय निवृत्त न्यायाधीशांकडे द्यावी
- हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात उत्तर प्रदेशच्या बाहेर चालवावा