धुळे - जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात तब्बल 80 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 721 वर पोहोचली आहे. तर नागरिकांनी वाढत्या संख्येला घाबरून न जाता काळजी घ्यावी, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
बुधवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार, धुळे जिल्ह्यातील शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 23 अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले होते. जिल्हा रुग्णालय धुळे येथील 70 अहवालांपैकी 34 अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. तर रात्री आलेल्या अहवालानुसार जिल्हा रुग्णालय धुळे येथील 61 अहवालांपैकी 10 अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 24 अहवालांपैकी जिल्ह्यातील 12 अहवाल आणि पारोळा येथील एक पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे. यामुळे बुधवारी दिवसभरात एकूण 80 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - पेट्रोलच्या किमतींमुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री; जाणून घ्या राज्यभरातील दर
यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 721 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 339 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 49 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 333 जणांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी वाढत्या संख्येला घाबरून न जाता काळजी घ्यावी, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.