धुळे - साक्री तालुक्यातील लोणखेडी येथील एका आठ वर्षीय चिमुकलीला ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. ही बालिका कुटुंबीयांसोबत पंढरपूरच्या वारीला निघाली होती.
लोणखेडे येथील एक ८ वर्षीय चिमुकली वारीसोबत पंढरपूरला निघाली होती. या चिमुकलीचा टेंभुर्णीजवळ ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुरझड ता.धुळे येथील सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या बुरझड-पंढरपूर पायी दिंडीत यंदा ९५ पुरुष, २५ महिला व ५ ते ६ लहान मुले होती. दिंडीचे प्रमुख बुरझड येथील वसंत रेवजी पाटील आहेत. लोणखेडे ता.साक्री येथील मनीषा रमेश व्हटगर (वय ८) ही तिची आजी पिताबाई बंडू व्हटगर यांच्यासोबत वारीमध्ये पंढरपूरला जाण्यासाठी निघाली होती.
दिंडी अकोला ता. माढा येथील मुक्कामानंतर टेंभुर्णीमार्गे बेबळेकडे निघाली. सकाळी १० वाजता बेबळे येथील कदम वस्तीत वारकरी जेवणासाठी थांबले. सामान वाहण्यासाठी त्यांच्यासोबत ट्रक होता. ट्रकमध्ये मागच्या बाजूला बसलेल्या मनिषाने ट्रक थांबताच खाली उडी मारली. यानंतर ट्रक चालकाने मागे न पाहताच ट्रक मागे घेतला. क्लीनर बाजूच्या मागच्या चाका खाली येऊन मनीषा दबली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
ट्रक चालक दीपक एकनाथ पाटील (रा. बुरझड ता.धुळे) याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.