धुळे - शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातून ७२ मीटर लांब तिरंग्याची रॅली काढण्यात आली. शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली.
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज शहरात विविध कार्यक्रम झाले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ७२ मीटर लांब तिरंग्याची रॅली काढून आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात आली. या रॅलीत शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि अभाविपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. शहरातील जे. आर. सिटी विद्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला.