धुळे - शहरात कोरोना विषाणूचा विळखा वाढत आहे. या आजाराचे रविवारी रात्री नऊनंतर आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या २३ झाली असून साक्रीतील चार, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी दोन रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ३१ वर पोहोचला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
धुळे महापालिका हद्दीत सात प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर झाले असून ते प्रशासनाने 'सील' केले आहेत. शिवाय काही अटीशर्तींसह दुपारी दोननंतर शहरात संचारबंदी आणि पूर्णत लॉकडाऊनचे आदेश लागू आहेत. शहरातील आझादनगर क्षेत्रातील गरीब नवाज नगरमधील पूर्वीच कोरोना बाधित असलेल्या तरुणाची ४० वर्षीय आई आणि ८३ वर्षीय आजीला 'कोरोना'ची लागण झाली आहे. तसा अहवाल सर्वोपचार रुग्णालयाकडून रविवारी रात्री प्राप्त झाला. यापाठोपाठ ह्रदयावर बायपास शस्त्रक्रियेसाठी २७ एप्रिलला नाशिक येथे एका खासगी रुग्णालयात रवाना झालेल्या ६५ वर्षीय कापड व्यावसायिकाला नाशिक येथे कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा ३१ वर पोहोचला. यापैकी आतापर्यंत एकूण धुळे शहरात सर्वाधिक २३ साक्रीत चार, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातही धुळे शहरातील चौघांचा, तर साक्रीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी, कोरोनाचे जिल्ह्यात २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.
रविवारी सायंकाळपर्यंत १८२ जणांचे थर्मल स्कॅनिंग -
शहरालगत भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात रविवारी सायंकाळी सहापर्यंत १८२ व्यक्तींचे थर्मल स्कॅनिंग झाले. त्यात १९ जणांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तसेच त्यांचे नमुने तपासणीसाठी घेवून चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील पॉझिटिव्ह २३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून बाकी स्थिर असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले. दरम्यान, सर्वोपचार रुग्णालयातील लॅबकडून धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील रुग्णांचे नमुने तपासले जात होते. मात्र, मालेगाव येथील नमुन्यांची तपासणी आता नाशिक येथे होत असल्याने येथे काही दिवसांत तपासणीच्या नमुन्यांमध्ये घट होत आहे.