धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील वृद्ध दाम्पत्याला तपासणीसाठी धुळे येथे पाठवले. मात्र, तपासणी न करता ते परत शिरपूरमध्ये आले. त्यानंतर त्यांना पुन्हा तपासणीसाठी पाठवले असता ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.
धुळे येथील जवानाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. त्यानंतर धुळे येथून शिरपूर तालुक्यातील अर्थे येथे आलेल्या जवानाच्या पत्नीला व त्याच्या लहान मुलीची तपासणी केली असता त्या दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह मिळून आला. यानंतर शिरपूर प्रशासनामार्फत जवानाच्या आई-वडीलांना शिंगावे येथील कोवीड केअर सेंटर येथे पाठवून १४ मे रोजी धुळे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, तेथून हे वृद्ध दाम्पत्य तपासणी न करता सायंकाळी शिरपूर येथील घरी दिसून आले. यामुळे एकच खळबळ उडाली होती. स्थानिक प्रशासनाने पुन्हा त्या वृद्ध दामपत्याला शिंगावे कोवीड सेंटर येथे पाठवून दुसऱ्या दिवशी त्यांची तपासणी करण्यात आली. रविवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे ते कोणाच्या वाहनाने धुळे येथून शिरपूरमध्ये परत आले. त्यांच्या संपर्कात कोण आलेत? याचा शोध घेतला जात आहे.
शिरपूर तालुक्यात पहिल्यांदा आमोदे येथील माय लेकींचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मात्र, धुळे येथे उपचारानंतर दोघीही कोरोनामुक्त झाल्या. तसेच त्यांच्या संपर्कातील लोकांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश येथून आमोदे येथे आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.