धुळे - पाणीटंचाईने एका १३ वर्षीय चिमुकलीचा बळी घेतल्याची घटना धुळे तालुक्यातील मोरदड तांडा येथे घडली आहे. एका खासगी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय चिमूरडीचा विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून ५० फुट खोल विहिरीत पडल्याने मृत्यू झाला.
धुळे तालुक्यातील मोरदड तांडा गावात गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे. वेळेवर पाणी मिळत नसल्याने या ठिकाणी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. दरम्यान, या गावात राहणाऱ्या नंदिता नथुसिंग पवार या १३ वर्षीय मुलीला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी घडली. नंदिता पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली असतांना तिचा पाय घसरला. ती ५० फूट खोल विहिरीत पडल्याने तिला जबर मार लागला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मोरदड तांडा गावात एकच हळहळ व्यक्त होत असून नंदिताच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.