चंद्रपूर- जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य नियोजन आणि संरक्षण केल्याने वाघांची संख्या येथे शंभराहून अधिक झाली आहे. वन्यजीव शृंखलेत सर्वोच्चस्थानी असलेला वाघ वाचला तरच पर्यावरण वाचेल हे साधं आणि सोपं गणित आहे. मात्र, एक वेळ अशीही होती जेव्हा ताडोबात वाघांची शिकार केली जायची, अत्यंत अमानुष आणि क्रुर पद्धतीने त्यांना संपविले जायचे. केरळ येथे हत्तीणीचा मृत्यू झाला आणि पुन्हा हा विषय चर्चेला आला.
एक वाघाला मारण्याचे एक लाखापर्यंत पैसे दिले जायचे....
मध्य भारतातील बहेलिया या जमातिचा पारंपरिक व्यवसाय शिकार आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्या शिकार करण्यात गेल्याने जंगल आणि तेथील प्राणी यांचा त्यांना असलेला अभ्यास हा कुठल्याही वन्यजीव अभ्यासकांना लाजविणाराच होता. मात्र, याचा वापर ते शिकार करण्यासाठी करत. या शिकारी टोळींचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्याने आता वाघाच्या शिकारीला प्रचंड मागणी आली होती. एक वाघाला मारण्याचे त्याकाळी त्यांना एक लाखापर्यंत पैसे मिळायचे. त्यामुळे मध्यप्रदेशपासून तर चंद्रपूरच्या ताडोबापर्यंत त्यांचा वावर असायचा. वर्षाला तीन ते चार वाघांची शिकार ते इथे येऊन करायचे.
वाघाची वाट हेरुन येथे ट्रॅप लावले जायचे...
साधारण वीस ते तीस वर्षांपूर्वी जसे आता व्याघ्रसंवर्धन आणि वनसंवर्धन होते तशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे या टोळीसाठी संपूर्ण रान मोकळे होते. आधी गावपरिसरातील काही खबऱ्यांकडून वाघ आणि त्या परिसराची माहिती घायची आणि मग जंगलात शिरायचे. वाघाच्या शोधात अनेक दिवस घालवायचे, मिळेल ते खायचे, जमेल तिथे झोपायचे. वाघ दिसला की, त्याच्या येण्याजाण्याचा मार्ग हेरायचा. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेने वाघाच्या भ्रमंतीवर मर्यादा येते. त्यामुळे वाघाची वाट हेरुन येथे ट्रॅप लावले जायचे. 'वायर ट्रॅप' किंवा 'जॉ ट्रॅप' अशा क्रुर आणि अमानुष पद्धतीने वाघांना ठार मारले जायचे.
वनरक्षकाचा पाय टॅपवर पडाला आणि.....
चिमट्यात वाघाचा पाय पडला तर त्याच्या हाडाचा अक्षरशः चुराळा व्हायचा. अनेक दिवस रक्तबंबाळ आणि वेदनेने व्हीवळत अशा वाघांचा मृत्यू व्हायचा. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र, 2012 ची ही अशी शेवटची घटना ठरली जी तितकीच महत्वाची आहे. एप्रिल महिन्यात या टोळीने पळसगाव क्षेत्रातील पाणवठ्यावर आपले ट्रॅप लावून ठेवले. त्यांचा अभ्यास एवढा सटीक की, दोन ठिकाणी लावलेल्या दोन्ही ट्रॅपमध्ये दोन वाघ सापडले. एक वाघ हा वायर ट्रॅपमध्ये सापडला होता. तो वेदनेने विव्हळत मरणाची वाट बघत होता त्याला सुदैवाने वनविभागाने वाचविले. मात्र, दुसरा वाघ हा जॉ ट्रॅपमध्ये अडकला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे घटनास्थळी चौकशी करण्यासाठी गेलेले वनरक्षक यांचाही एका ट्रॅपवर पाय पडला. पायात बूट असल्याने बूट पिंजऱ्यात फसला आणि ते थोडक्यात बचावले. अन्यथा त्यांच्या पायाचा चुरा झाला असता.
यानंतर कधी असा प्रकार घडला नाही. मात्र, या घटनेच्या साक्षीदारांसाठी आजही ही घटना अंगावर काटा आणणारी आहे. केरळ येथे अशाच प्रकारे एका गर्भवती हत्तीनीचा नाहक जीव गेला. मात्र, यापेक्षाही क्रुर घटना चंद्रपूरसारख्या ठिकाणी घडलेल्या आहेत. अशा घटना थांबल्या तरच पर्यावरणाचे खऱ्या अर्थाने संवर्धन होऊ शकेल असे मत ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे.