राजुरा (चंद्रपूर) - नळ आहेत पण पाणी नाही, पाणी आलेच तर शुद्ध नाही, अशी बिकट अवस्था संतनगरीची झाली आहे. सतत घडणाऱ्या या प्रकाराला वैतागलेल्या महिलांनी थेट धाबा ग्रामपंचायत गाठली. नळ आहेत, पण विहिरीच्या पाण्याचाही पुरवठा करा, स्वतंत्र पाणी टाकी द्या, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.
धाबा पाणीपुरवठा योजनेतून धाबा गावाला पाणीपुरवठा केला. ही योजना ठेकेदारामार्फत चालवली जाते. योजना चालवणाऱ्या ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे. महिन्यातून अनेक दिवस योजना बंद असते. ठेकेदाराच्या अनेक तक्रारी पाणी पुरवठा विभागाकडे पडून आहेत. मात्र त्या तक्रारींकडे विभागाचे अद्यापही लक्ष गेलेले नाही. सतत घडणाऱ्या या प्रकाराला कंटाळलेल्या सविधान चौकातील रणरागीनी आता संतापल्या आहेत. थेट ग्रामपंचायतीवर धडक देऊन निवेदनातून त्यांनी व्यथा मांडल्या.
योजना बंद असल्या दिवशी सविधान चौकातील महिलांना अर्धा किमी अंतरावरुन पाणी आणावे लागते. मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद होता. दोन दिवसापासून नळांना पाणी येतेय खरे मात्र येणारे पाणी हिरवट रंगाचे आहे. त्यामुळे या पाण्याचा पिण्यासाठी वापर न करता कपडे धुण्यासाठी नागरिक करत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर महिलांना धाव घ्यावी लागत आहे. आज ( सोमवार ) ग्रामपंचायतवर महिलांनी धडक दिली. ग्रामपंचायतकडे निवेदन दिले. गावात गेलेल्या मुख्य पाईपलाईनला सविधान चौकात गेलेली पाईपलाईन जोडावी, सविधान चौकात स्वतंत्र पाणी टाकी द्यावी. या टाकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील विहिरीचे पाणी सोडावे, अशी मागणी मायाबाई कोरडे, शोभाबाई उराडे, कमलाबाई पामुलवार, निलिमा रायपुरे, माधुरी झाडे, जिजाबाई फुलझले, मारुबाई शर्मा, कविता जुनघरे या महिलांनी केल्या आहेत. या विहिरीतील पाण्याचा पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्र, उप पोलीस स्टेशनला केला जातो. तर ज्या दिवशी नळ येत नाही, त्या दिवशी बसस्थानक परिसरातील महिला या विहिरीवर गर्दी करतात.