चिमूर (चंद्रपूर) - तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोटेगाव येथील एका महिलेचा अपघातात तर शिवणपायली येथील तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. कुसुम सुधाकर दडमल (वय ४५ वर्षे) व सुरज भास्कर घोनमोडे (वय १९ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
मोटेगाव येथील कुसुम दडमल या त्यांच्या मुलाच्या मित्राच्या दुचाकीने सोनेगाव (वन) येथे जात होत्या. सकाळी १०.०० वाजताच्या दरम्यान पंचायत समितीसमोर दुचाकी आणि चारचाकीत धडक झाली, या अपघातात कुसुम दडमल यांचा मृत्यू झाला. तर शिवणपायली येथील दोन दिवसापासून बेपत्ता असलेला सुरज घोनमोडे या १९ वर्षीय गतिमंद तरुणाचा मृतदेह गावातील त्याच्या मामाच्या विहिरीत तरंगताना आढळला.
पंचायत समिती चिमूरसमोर चारचाकी वाहनाने मागून जबर धडक दिल्याने कुसुम खाली पडल्या व त्यांच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचाराकरता उप-जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चिमूर पोलिसांकडून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.
दुसरी घटना नेरी जवळील शिवणपायली येथील असून सुरज घोनमोडे हा गतिमंद मुलगा मामा कनिलाल नाकाडे यांचेकडे राहत होता. मामाकडे जमेल ते काम करीत होता. दोन दिवसापासून तो बेपत्ता झाला होता. खूप शोध घेतल्यानंतही त्याचा थांगपत्ता लागला नाही. आज पहाटे मामाच्या घराच्या आवारातच असलेल्या विहिरीत सुरजचा मृतदेह तरंगताना दिसून आला.