चंद्रपूर - मुलीच्या घरच्यांनी तिला तिच्या पतीच्या घरातून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याविरोधात पतीने चिमूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, तक्रारीनंतर ४ दिवस उलटूनही पत्नीचा पत्ता लागत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचे पतीने सांगितले. तरीही अद्याप पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे पतीचे म्हणणे आहे. पत्नीच्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न केल्याने त्यांनी नियोजनपूर्वक पत्नीला घरातून उचलून नेले, असे पतीने म्हटले आहे.
श्रीकांत चरणदास पाटील असे या पतीचे नाव असून ते मासळ येथील रहिवासी आहेत. पोलिसांकडे दाद न मिळाल्याने त्यांनी डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे २६ ऑक्टोबरला तक्रार दिली. घडलेल्या प्रकाराविषयी श्रीकांत यांनी अधिक माहिती दिली आहे.
हेही वाचा - निवडणुकीदरम्यान जोरगेवार-भांगडीयांची झाली गुप्त बैठक? राजकीय चर्चेला उधाण
'श्रीकांत यांचे १ ऑक्टोबरला बौद्धविधी व विवाह नोंदणीनुसार लग्न झाले. ६ ऑक्टोबरला मुलीच्या आई वडीलांनी मुलगी हरविल्याची तक्रार चिमूर पोलीसात केली होती. दरम्यान, दोघेही पती-पत्नी चिमूर पोलीसात दाखल झाले होते, पोलीसांनी दोघांचाही जबाब घेतला होता. पत्नीने पतीकडे राहणार असल्याचे पोलिसांना सांगितले. २५ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता मुलीचे आई, वडील, भाऊ व नातेवाईक चारचाकी वाहनाने त्यांच्या घरी आले. त्यांनी नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगत त्यांच्या मुलीला सोबत चलण्यास सांगितले. तिने नकार देताच तिच्या पतीला पकडून ठेवण्यात आले आणि तिला बळजबरीने गाडीने बसवून नेले,' अशी माहिती पती श्रीकांत यांनी दिली. हा सर्व प्रकार नियोजित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या, आमदार सुभाष धोटेंची मागणी
'पोलिसांनी माझ्या पत्नीचा शोध घेवून माझी पत्नी मला परत मिळवून द्यावी. माझ्या पत्नीने काही बरेवाईट केल्यास याची जबाबदारी मुलीच्या कुटुंबीयांची व पोलीस प्रशासनाची राहील. माझी पत्नी मला परत न मिळाल्यास आत्मदहन करेन,' असा इशारा पती श्रीकांत यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
हेही वाचा - बिबट्याच्या चामडीसह ९ आरोपी ताब्यात; भरारी पथकाची कारवाई