चंद्रपूर - कामावर जातो, असे सांगून गेलेला पती घरी परतलाच नाही, अशी तक्रार एका महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र, अद्यापही तिच्या पतीचा थांगपत्ता लागलेला नाही.
बिनाज्य मोहनसिंग कुमारिया असे त्या महिलेच्या पतीचे नाव आहे. समीक्षा बिनाज्य कुमारिया यांचा बिनाज्य मोहनसिंग कुमारिया यांच्याशी २३ नोव्हेंबर २०१८ ला प्रेमविवाह झाला. बिनाज्य हा शहरातील एक पेंटच्या दुकानात तर समीक्षा गृहदीप गिफ्ट सेंटरमध्ये काम करत होती. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. ११ फेब्रुवारीला दोघेही घरून कामासाठी निघाले. यावेळी पतीची प्रकृती बरी नसल्याचे समीक्षाला कळले. तिने त्याला दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. परंतु, त्याने हा सल्ला फेटाळत तू आपल्या कामावर जा आणि मी पण कामावर जातो, असे सांगितले.
काम आटोपून समीक्षा रात्री घरी आली असता तिला घराचे दार बंद दिसले. तिने पतीच्या मोबाईलवर संपर्क साधला, मात्र तो बंद होता. यानंतर समीक्षाने वर्धा जिल्ह्यातील सारंगीपूर येथे सासुरवाडी गाठली. मात्र सासू सासऱ्याने तिला कुठलेही उत्तर दिले नाही. तुझ्या पतीची माहिती तुला असायला हवी, असे उत्तर मिळाले. यानंतर १३ फेब्रुवारीला समीक्षाने रामनगर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. आज महिना उलटला तरी पती बिनाज्य यांचा कुठलाही थांगपत्ता लागलेला नाही.