चंद्रपूर - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन अतिशय खबरदारी घेत आहे. देशात आणीबाणीची स्थिती उद्भवलेली असतांना वनविकास विकास महामंडळाला याचे जराही गांभीर्य नसल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. कन्हाळगांव वनपरिक्षेत्रात जवळपास 40 मजूरांकडून लाकूडतोडीचे काम सुरु आहे.
कन्हाळगाव वनपरिक्षेत्रांर्तगत येत असलेल्या कक्ष क्रं.18 मध्ये लॉकडाउनच्या काळात गेल्या 7 दिवसांपासून लाकूडकटाईचे काम करण्यात येत आहे. विभागाच्या नियमानुसार जंगलात 5 मजूरांना काम करता येते. मात्र, या ठिकाणी तब्बल 35 ते 40 मजूर काम करताना दिसून येत आहेत.
करंजी, विहीरगाव, कन्हाळगाव व धामणपेठ गावातील मजूर वृक्षतोडीचे काम करत आहेत. लॉकडाउनमध्ये कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. राज्यात संचाबंदी लागू आहे. संचारबंदीत 5 व्यक्ती एकत्र आले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र, कन्हाळगाव वनपरिक्षेत्रात चक्क 35 ते 40 मजूर एकत्र काम करत आहेत.
या मजूरांना कोणतीच सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आलेली नाही. या संदर्भात गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी आमच्याकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नसून हा प्रकार नियमाचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हणाले. विहीरगावचे सरपंच जिवनदास चौधरी यांनी देखील वनविकास महामंडळाच्या या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी शासन नियम पायदळी तुडवण्याच्या याप्रकरणी संबधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.