चंद्रपूर - शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची कोरोना चाचणी बुधवारी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, त्यांच्या संपर्कात आल्याने जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी यांच्यासह संपूर्ण आरोग्य यंत्रणाच क्वारंटाइन झाली आहे. तसेच हे अधिष्ठाता नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या देखील संपर्कात आले. पहिल्या दिवशी त्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन स्वागत केले होते. मात्र, जिल्हाधिकारी यांना क्वारंटाइनमधून सूट मिळाली आहे.
मागील दोन दिवसांत जिल्हा प्रशासनात धक्कादायक बदल झाले. कोरोनाच्या काळात उत्तम काम करीत असलेले जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागी जलस्वराज विभागाचे प्रकल्प संचालक अजय गुल्हाने यांची नियुक्ती करण्यात आली. यासाठी त्यांनी थेट मुंबईहून प्रवास करीत चंद्रपूर गाठले. त्यांनी मंगळवारी दुपारी आपल्या पदाची सूत्रे सांभाळली. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या बैठकी देखील घेतल्या. त्यात त्यांनी कोरोनाची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी आरोग्य यंत्रणेतील सर्व बडे अधिकारी उपस्थित होते.
यानंतर नवे जिल्हाधिकारी यांचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी त्यांची भेट घेतली. आरोग्य यंत्रणेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यामध्ये चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता देखील होते. त्यांना काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे होती. मंगळवारी त्यांची अँटीजेन चाचणी केल्यावर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या बैठकीत असलेले जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देखील क्वारंटाईन व्हावे लागले. त्यांच्या अँटीजेन चाचणीचे परिणाम निगेटिव्ह आले असले तरी पुढील दोन दिवसांनी त्यांचे स्वॉब घेतले जाणार आहेत. त्याचा निकाल यायला आणखी एक दिवस लागेल. म्हणजे चाचणी निगेटिव्ह जरी आली तरी पुढील तीन दिवस त्यांना अलगिकरनातच राहावे लागेल.
मात्र, अधिष्ठाता यांच्या संपर्कात आलेले जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना मात्र यातून सूट देण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी संपूर्ण काम हे जिल्हाधिकारी कार्यालयातूनच पार पाडले. तर जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सध्या 'वर्क फ्रॉम होम'करावे लागत आहे. यामुळे कोरोना रुग्णाशी संपर्कात आल्यावर नेमके कुणाला क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कुणाला सूट तर कुणाला सक्ती आहे, हे कळायला अजून मार्ग नाही. निदान या उदाहरणातुन हेच दिसून येत आहे.