चंद्रपूर : घरातील सदस्य हरवला किंवा घर सोडून गेला तर त्यासाठी घरातील व्यक्ती कासावीस होऊन त्याचा शोध घेतात. नाही मिळाला तर पोलिसांना माहिती देऊन वर्तमानपत्रात जाहिरात देतात. त्यातही समाधान झाले नाही तर त्या व्यक्तीला शोधून देणाऱ्या व्यक्तीसाठी बक्षिस जाहीर करतात. ही बाब सामान्य आणि अपेक्षित अशीच आहे. मात्र हे सगळं एखादा पाळीव प्राण्यासाठी होत असेल तर?, तर अशी घटना दुर्मिळच म्हणावं लागेल. मात्र, ही बाब सत्य असून, एका कुत्र्याला शोधून देण्यासाठी ( Lost Pet Dog In Chandrapur ) त्याच्या मालकाने थेट बक्षीस जाहीर केलं ( Reward For The Dog Finder ) आहे. तेही एक दोन हजार नाही तर तब्बल 50 हजार इतकं. जोरू असे या कुत्र्याचे नाव असून, डॉ. दिलीप कांबळे असे त्याच्या मालकाचे नाव आहे.
एक महिन्याचा असताना सांभाळ
डॉ. डिलीप कांबळे हे मूळचे नागपुरचे असून, त्यांचे रामाळा तलाव मार्गावर सिटी स्कॅन, एमआरआय सेंटर आहे. येथेच त्यांचे निवासस्थान देखील आहे. त्यांच्या सोबत असतो तो जोरू नावाचा कुत्रा. अगदी एक महिन्याचा असताना त्याला डॉ. कांबळे यांनी विकत घेतले. लाब्राडोर क्रॉस जातीचा असलेल्या या कुत्र्याचा सांभाळ कांबळे कुटुंबीयांनी तो लहान असतानापासूनच केला. तेव्हापासूनचा तो घरचा एक सदस्य झाला. त्याला काय हवं, काय नको याची काळजी कांबळे कुटुंब घेत होते.
फिरायला गेला तो परत आलाच नाही
सकाळी जोरुला कांबळे कुटुंब फिरण्यासाठी बाहेर सोडत होते. तो घराच्या आजूबाजूलाच फिरत असायचा. एकदीड तास झाला की तो परत आपल्या घरी यायचा. साधारण 15 दिवसांपूर्वी जोरू बाहेर गेला मात्र परत आलाच नाही. डॉ. कांबळे यांनी त्याची खूप शोधाशोध केली. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. जोरू हा अतिशय मनमिळावू असल्यामुळे तो कुणाकडेही सहज जायचा. याचाच फायदा कोणीतरी घेतला असावा आणि त्याला चोरून नेले असावे, असा संशय डॉ. कांबळे यांना आहे.
शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
जोरू गायब झाल्यावर त्याला शोधण्यासाठी डॉ. कांबळे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. मात्र तो मिळाला नाही. महापालिकेच्या डॉग स्नॅचर पथकाने तर हा कुत्रा नेला नसावा याचीही शहानिशा केली. त्यामुळे जोरुचा फोटो टाकून त्याची माहिती देणाऱ्यास तब्बल 50 हजारांचे बक्षीस जाहीर करून सोशल मीडियावर ही पोस्ट टाकली मात्र, तरीही त्याची माहिती मिळाली नाही. आता जोरुचे पॉम्पलेट छापून ते वर्तमानपत्रात देणार आहेत. तसेच स्थानिक वर्तमानपत्रात देखील त्यांनी याची जाहिरात दिली आहे. एव्हढेच नव्हे तर एखाद्या चोरट्याने या कुत्र्याला कुणाला विकले असेल तर ज्याने त्याला घेतले त्यापेक्षा तीन पटीने पैसे देण्याची तयारी डॉ. कांबळे यांनी दर्शवली आहे.
मुलीने जेवण सोडले
डॉ. कांबळे यांनी मुलगी कांशी हिला जोरुचा फार लळा लागला होता. आठ वर्षीय कांशी त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती. दिवसरात्र ती त्याच्यासोबतच खेळत असायची. मात्र जोरू गायब झाल्याचे तिला कमालीचे दुःख झाले. जोरूला परत आणा नाहीतर मी जेवणार नाही असा तगादा तिने लावला. तब्बल सात दिवस ती काही खायला प्यायला तयार नव्हती. तिची समजूत काढली तरी ती मानायला तयार नव्हती. दररोज ती जोरूचाच तगादा लावत असते, असे डॉ. कांबळे सांगतात. आमच्या घरातील एक सदस्य हरवला असल्याचे आम्हाला वाटत आहे, असे कांबळे म्हणतात. पाळीव प्राण्याचाही माणसाला इतका लळा असतो याचे दुर्मिळ उदाहरण डॉ. कांबळे यांच्या प्रसंगातून दिसून येत आहे.