चंद्रपूर - राजुरा विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार युवकांनी एल्गार पुकारला आहे. आपल्या समस्या कुठल्याही लोकप्रतिनिधीने सोडवलेल्या नाहीत. त्यामुळे आमचे प्रतिनिधित्व करणारा उमेदवार आम्ही आपल्यातूनच निवडू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या जिवती, कोरपना, गडचांदूर, गोंडपीपरी या दुर्गम भागातील शेकडो विद्यार्थी चंद्रपुरात येतात. त्यांच्या क्षेत्रात विकासाची दैनावस्था आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते यावर कुठलेच ठोस काम झालेले नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या उदेशातून हे विद्यार्थी चंद्रपुरात येत आहेत. येथे त्यांना पराकोटीचा संघर्ष करावा लागतो. अत्यंत गरीब कुटुंबातील हे विद्यार्थी मिळेल ते काम करून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. मात्र, शासनाच्याही जागा आता कमी निघत आहेत. यात निवडक विद्यार्थ्यांना यश येते तर उर्वरित विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडते. तयारी करताना तारुण्य गेलेल्या अनेकांना आता नेमके काय करावे हा प्रश्न असतो. त्यांच्या क्षेत्रातही रोजगार आणि अन्य सोयीसुविधांचा अभाव असल्याने ते परतही जाऊ शकत नाहीत.
यापूर्वीच्या लोकप्रतिनिधी या साठी कुठलेही ठोस काम केले नाही. याचा संताप या युवकांमध्ये आहे. म्हणूनच आता या विद्यार्थ्यांनी आपल्यातून एक उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला कुठलाही उमेदवार नको. आमच्या समस्या सोडविण्यासाठी आता आम्ही आपल्यातलाच उमेदवार उभा करू. ज्याला आमच्या समस्या माहीत आहेत. त्यालाच आम्ही मतदान करू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यासाठी आज या विद्यार्थ्यांनी हनुमान मंदिरात चर्चेचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांचा उमेदवार ठरवला जाणार आहे. आपल्या हक्काच्या विकासासाठी आता निवडणूकित उतरण्याचा निर्णय या युवकांनी घेतला आहे.