चंद्रपूर - चिमूर शहराला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी उमरेड-चिमूर-वरोरा या मार्गाला मंजुरी मिळाली. कंत्राटदारांने तीन वर्षापासून कामाला सुरुवात केली. मात्र कंत्राटदार व अधिकाऱ्यांची निष्काळजी आणि दुर्लक्षाने महामार्गाचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे पंधरा दिवसात महामार्ग सुरळीत झाला नाही तर वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
चिमूर - वरोरा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य वाढले आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. मार्गावर अनेक अपघात झाले असून काहींचे जीव देखील गेले आहेत. रस्त्यावरील धुळीमुळे प्रवाशांना डोळ्यांचा आणि श्वसनाचा त्रास उद्भवत आहे. शिवाय मणक्याचे आणि सांध्याच्या आजारात देखील वाढ होत आहेत. मात्र कंत्राटदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात महामार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळस तालुकाध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे, शालिक थुल, विनोद सोरदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.