चंद्रपूर - वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटून दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झालेत. ही घटना कोरपना तालूक्यातील तूळशी-जेवरा मार्गावर आज गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान घडली. अनिल परचाके आणि देवराव नैताम अशी मृतांची नावे आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कोरपना तालूक्यात राजरोषपणे वाळू तस्करी सुरू आहे. तस्करांना महसूल विभाग पाटीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. पैनगंगा-वर्धा नदीतील पात्रातून चोरमार्गाने वाळू तस्करी सुरू आहे. वाळू वाहतूक करणारे वाहने रात्र-बेरात्र धावत असतात. आज पहाटे तीन वाजताच्या दरम्यान तांबाडी घाटातून एक ट्रॅक्टर वाळूचा भरणा करून तुळशी-जेवरा मार्गाने निघाला होता. ट्रॅक्टरवर धानोली तांडा गावातील अनिल परचाके, देवराव नैताम, रामराव परचाके आणि शंभु मडावी हे चार मजूर होते.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरखाली दबल्याने अनिल परचाके व देवराव नैताम या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रामराव परचाके व शंभू मडावी हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहीती पोलिसांना देण्यात आली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पलटी झालेला ट्रॅक्टर कोरपना नगर परिषदेतील नगरसेवकाच्या मालकीचा असल्याची माहीती आहे. या घटनेमुळे धानोली तांडा गावात शोककळा पसरली आहे.