चंद्रपूर - नियंत्रण सुटलेल्या भरधाव ट्रॅव्हल्सने दुभाजक ओलांडून थेट समोरच्या ट्रकला धडक दिली. ( Truck-Travel Accident in Varora ) ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनाचे कॅबिन एकमेकांत घुसले. यात दोन्ही वाहनचालकांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ( Two dies thirteen injured in varora accident ) ही घटना वरोरा शहराच्या रत्नमाला चौकातील लगान बारजवळ सायंकाळच्या सुमारास घडली. ( Accident near Ratnamala Chowk Varora )
वाहकाने प्रवाशांचे ऐकले नाही -
मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष नामक कंपनीची ट्रॅव्हल्स एमएच 40 एटी 481 ही नागपूर येथून 40 प्रवाशांना घेऊन चंद्रपूरच्या दिशेने दुपारी निघाली होती. चालक साबीर शेख (वय 45) हा भरधाव वेगाने गाडी चालवत होता. यावेळी अनेक प्रवाशांनी त्याला वाहन हळू चालविण्याचे सांगितले मात्र त्याने ऐकले नाही. ट्रॅव्हल्स वरोरा येथील रत्नमाला चौकात आली असताना चालक हा फोनवर बोलत गाडी चालवत होता. यावेळी त्याचे अचानक नियंत्रण सुटले. यावेळी ट्रॅव्हल्सचा वेग इतका होता की दुभाजकवर असलेल्या खांबाला धडक देऊन हे वाहन थेट समोरच्या ट्रकवर धडकले.
खांब पूर्णपणे वाकून गेला. यात दोन्ही वाहनाच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे समोरचे भाग एकमेकांत घुसले. यात अनेक प्रवाशी अडकले गेले. शेवटी कटरच्या माध्यमातून गाडीचा काही भाग कापून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जेसीबी आणि हायड्रासारख्या वाहनांचा उपयोग यासाठी करावा लागला. या अपघातामुळे अनेक तास वाहतूक ठप्प झाली. गंभीर जखमी प्रवाशांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हेही वाचा - VIDEO : कोविड प्रमाणपत्रासाठी आशा वर्करला मारहाण; कळंब तालुक्यातील घटना
तातडीने वैद्यकीय उपचार करा - पालकमंत्री
वरोरा येथे झालेल्या भीषण अपघाताबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना नागपूर येथील बैठकीत माहिती मिळताच त्यांनी तातडीने बैठक आटोपती घेतली. लगेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोन करून, अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले. अपघातग्रस्तांसाठी त्वरीत रुग्णवाहिका पाठवून ग्रामीण रुग्णालय, चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय येथे क्षणाचाही विलंब न करता उपचार करावे. अपघातानंतरचा एक तास अतिशय महत्त्वाचा असतो. जास्तीत जास्त रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असेही त्यांनी म्हटले.