राजूरा (चंद्रपूर)- गोंडपिंपरी तालुक्यातील तोहगाव परिसरात वाघाचा वावर वाढला आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे या वाघाला वेळीच जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच 15 ऑगस्टपर्यंत या वाघाला जेरबंद नाही केले तर आंदोलन करणार असल्याचाही इशारा दिला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील बरीच गावे जंगल परिसराला लागून आहेत. जंगलात अनेक हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. काही वन्यजीव शेतीपिकांचे ही नुकसान करत असल्याचे समोर आले आहे. तसेच एका चितळाने महिलेवर हल्ला केल्याची घटनाही घडली होती.
सध्या शेती कामांना वेग आला आहे. मात्र, परिसरात वाघाचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली. तोहोगाव येथील शेतकरी दिनकर ठेंगरे बांबू आणण्यासाठी जंगलात गेले होते. त्यावेळी वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. त्यानंतर गाव परिसरात वाघाचा वावरदेखील वाढला आहे. यामुळे निर्माण झालेल्या भीतीचा परिणाम शेती कामावर होत आहे.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने तत्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तोहो गावच्या ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भाचे निवेदन त्यांनी वनविभाग दिले आहे. तसेच 15 ऑगस्टपर्यंत वाघास जेरबंद करण्यास वनविभागास अपयश आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी माजी उपसरपंच फिरोज पठाण, रमेश मोरे, आशिष मोरे, शुभम ठेंगरे, रविंद्र गौरकार आदिंसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.