चंद्रपूर - एकीकडे राज्यातील विद्यार्थ्यांना राजस्थानमधून परत आणण्यासाठी विशेष आणि मोफत बसची व्यवस्था केली जाते. तर मजूरांच्या सुविधेसाठीची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाही, अशी स्थिती समोर आली आहे. मिरची तोडणीसाठी तेलंगणात गेले होते. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात टाळेबंदी करण्यात आली. पण, टाळेबंदीमुळे हाताला काम नसल्याने खायचे काय, असा प्रश्न या मजूरांसमोर उभा ठाकला. काही दिवस ज्यांच्या शेतात ते मिरची तेडणी करत होते त्यांनी पोसले. पण, ते तरी किती दिवस पोसणार. अखेर मजूरांनी आपापल्या गावी निघण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरु झाली घरवापसीसाठी खटाटोप.
तेलंगणा सीमेबाहेर पडण्यासाठी काही परवानग्या घ्यावा लागतात. त्यासाठी काही खर्चही येतो. पण, एकदोन नव्हे सुमारे अडीच हजार मजुरांचा खर्च करायचा होता. ते त्या शेतकऱ्याला परवडणारे नव्हते. अखेर मजूरांनी पैशाची जुळणी सुरु केली व प्रत्येकी एक-एक हजार रुपये तेथील शेतकऱ्याला दिले. त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी सर्व सोपस्कार पार पाडून मजूरांना तेलंगणा सीमेच्या पार पोहोचविले. यासाठी 35 वाहनांमधून अडीच हजार मजूरांनी प्रवास केला.
महाराष्ट्रात येताच सुरु झाले हाल
तेलंगणाच्या सीमा ओलांडून हे मजूर महाराष्ट्रात आले. आपल्या राज्यात आल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता आपण लवकरच घरी पोहोचू असे त्यांना वाटू लागले. पण, तसे काहीच झाले नाही. तेलंगणामधून रितसर परवानग्या काढून त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. पण, महाराष्ट्रात कोणाला कशाप्रकारे माहिती देऊन मदत मागवावी याची कल्पना त्यांना नसल्याने ते सीमेवरून आपापल्या गावी पायी निघाले. त्यांच्यासोबत मोठ्याप्रमाणात साहित्य आणि लहान मुलेही आहेत. त्यामुळे भर उन्हात त्यांना पायी प्रवास करावा लागत असल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत.
गरिबांकडे सरकार लक्ष देणार का..?
शासनाकडून विविध उपाययोजना करुन परदेशात अडकलेल्या लोकांसाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली. राजस्थान येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी एस.टी.बसेसची सोय करण्यात आली. नांदेडमध्ये अडकलेल्या पंजाबी लोकांसाठीही सोय करण्यात आली. पण, यांसारख्या रोजंदारी करणारे मजूर देशातील विविध राज्यांत अडकले आहेत. अनेकांना स्वगृही परतण्यासाठी काय करावे हेच माहित नाही. अनेकांकडे आपले म्हणणे मांडण्यासाठी ट्वीटर सारखे समाजमाध्यम नाही. अशा गरिबांकडे सरकार लक्ष देणार का, असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
उपसरपंचांनी दिला मदतीचा हात
भुकेने व्याकुळ हे लोक पायी चालत होते. या लोकांना पोडसाचे उपसरपंच देविदास सातपुते यांनी जेवणाची व्यवस्था केली आणि गावातील एक सभागृह विश्रांतीसाठी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, या मजुरांचा घरी पोहोचण्याचा मार्ग अत्यंत खडतर आहे. त्यांना कोणीही गावात येऊ देण्यास तयार नाही. अशा वेळी या गरीब, थकलेल्या मजुरांनी काय करावे, हा प्रश्न उभा ठाकला आहे.
हेही वाचा - चंद्रपूरमध्ये परराज्यातील बांधकाम मजूरांचा उद्रेक, शेकडोंच्या संख्येने उतरले रस्त्यावर