चंद्रपूर - जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करत आहे. त्यातच आते तालुक्यातील हजारो हेक्टर शेतातील पिकांमध्ये वन्यजीव धुमाकूळ घातला आहे. वन्यजीवांकडून शेतातील पीके फस्त केली जात आहेत. शेतकऱ्यांनी मदतीसाठी वनविभागाकडे धाव घेतली आहे. मात्र, नुकसानीचा अर्ज घेऊन वन कार्यालय गाठणाऱ्या शेतकऱ्यांशी वन कर्मचारी उद्धटपणाने वागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा - रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना
जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका हा वनव्याप्त आहे. तालुक्यातील बहुतांश शेती जंगलालगत आहे. त्यामुळे शेत शिवारात वन्यजीवांचा आवास असतो. त्यामुळे वन्यजीवांकडून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. सद्यस्थितीत शेतात धान, कपाशीचे पीक आहे. ही दोन्ही पिकांची रानडुकरांनी नासाडी केली आहे. त्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
हेही वाचा - कापूस वेचणी ८ रुपये प्रतिकिलोवर; मजूर मिळेना, बळीराजाचे प्रश्न सुटेना
गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली, वटराणा, सूकवासी, धाबा, कुडेनांदगाव, सकमूर, गुजरी, वेडगाव, पोडसा, सोनापूर या भागातील शेती वन्यजीवांनी उद्ध्वस्त केली आहे. वन्यजीवांचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. नुकसानीचा अर्ज घेवून गेलेल्या शेतकऱ्यांशी वनकर्मचारी उद्धटपणे बोलतात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यासाठी वन कर्मचारी हजर होत नाहीत. अशी टीका वनविभागावर होत आहे. विशेष म्हणजे नुकसान लाखो रुपयाचे झालेले असताना मदतीची रक्कम अतिशय तोकडी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.