चंद्रपूर - राजुरा विधानसभा क्षेत्रात सर्रासपणे कोंबड बाजाराचा अवैध व्यवसाय सुरू आहे. येथे जुगार खेळला जातो, लगतच्या तेलंगणा राज्यातील बडे लोक येथे येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या हातात आता कुठे थोडे पैसे आले आहेत. अशावेळी जर शेतकऱ्यांना या नादी लावले जात असेल तर पुढे त्यांनी कशाच्या भरवशावर जगायचे हा प्रश्न उभा राहील. याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्वरित घेऊन कारवाई करावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने या कोंबड बाजारांचा सोक्षमोक्ष लावू, असा इशारा शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी दिला आहे.
राजुरा क्षेत्रात सध्या कोंबड बाजाराला उधाण आले आहे. राजुरा तालुक्यापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आर्वी-कापणगाव शेतशिवारात सर्रास कोंबडबाजार सुरू आहे. येथे एकाच दिवशी 70 ते 80 जोड्यांची लढत होते. यावर लाखोंची बाजी लावली जाते. सोबत लाखोंचा जुगार खेळला जातो. दोन लाख रुपये दाखवूनच जुगार खेळण्याची परवानगी आहे. इतके याचे भव्य स्वरूप आहे. यासाठी लगतच्या तेलंगणा राज्यातील जुगार खेळणाऱ्या श्रीमंत लोकांना येथे आणले जाते. रात्रभर हा जुगार खेळला जातो. एका दिवशीची उलाढाल कोटीच्या घरात आहे. येथे फोन पे आणि गुगल पे अद्यावत सुविधा आहे. शाळकरी मुलांचा येथे उपयोग होतो आहे. याचा म्होरक्या गोलू नामक व्यक्ती आहे. तर दुसरा कोंबड बाजार हा कोरपना तालुक्यातील विरुर-गाडेगाव येथे हा जुगार सुरू आहे. याचा म्होरक्या हा यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील 'मटका किंग' असल्याची माहिती आहे. येथे देखील हाच प्रकार आहे.
पोलीस प्रशासन आणि राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
तेलंगाणा राज्यातील बडे जुगारी येथे येत आहेत. एकूणच हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर आहे. मात्र, पोलीस प्रशासन यावर कुठलीही कारवाई करण्यास पुढे धजावत नाहीत. यावर शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी खंत व्यक्त केली आहे. कुठलाही अवैध व्यवसाय हा पोलीस प्रशासनाचा आशिर्वाद आणि राजाश्रयाशिवाय चालू शकत नाही, असे म्हणत त्यांनी पोलीस प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
...तर आम्ही आमच्या पद्धतीने कोंबड बाजाराचा सोक्षमोक्ष लावू
राजुरा क्षेत्रातील शेतकरी हा गरीब आहे. यावर्षी तर त्यांचे उत्पादन केवळ 50 टक्के इतके झाले आहे. एक वेळ उत्पादन घेऊन त्या पैशातून वर्षभर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह तो करीत असतो. जर त्यांच्या घामाचा पैसा अशा कोंबड बाजारात जुगार लावून उडत असेल त्यांनी पुढे कसे जगायचे? त्यांच्या मुलांना येथे अवैध धंद्यासाठी कामावर ठेवले जात असेल तर प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. स्थानिक पोलीस अधिकारी कारवाईसाठी एकमेकांवर बोट दाखवत आहेत. जर हे अधिकारी कारवाई करीत नसेल तर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याची त्वरित दखल घ्यावी आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करावा. तसे निवेदन आम्ही त्यांना दिले आहे. जर येत्या काळात त्यांनी यावर कारवाई केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने या कोंबड बाजाराचा सोक्षमोक्ष लावू असा इशारा अॅड. चटप यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. यावर जिल्हा पोलिस अधीक्षक कारवाई करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - गोलुच्या कोंबड बाजाराची बंगळुरूपर्यंत मजल; जुगार खेळण्यासाठी श्रीमंत ग्राहकांना आमंत्रण
हेही वाचा - चंद्रपूर: चक्क लग्न पत्रिकेतून दारूची तस्करी, व्हिडिओ झाला व्हायरल