चंद्रपूर - ताडोबातील बफर क्षेत्रात रविवारी सर्पदंशाने मुधोली येथील एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मात्र त्याच्या मृत्यूप्रकरणी आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. ताडोबा क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे रुग्णवाहिका वेळेत पोहचू शकली नाही, त्यामुळेच मुलाचा मृत्यू झाला असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. तर वनविभागाच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला, असा दावा केला होता. दोन्ही विभागाच्या प्रशासकीय यंत्रणांनी या मुलाच्या मृत्यू प्रकरणात आपआपले स्पष्टीकरण दिले आहे.
काय आहे वाद-
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातून जाणाऱ्या मार्गावर गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे येथील अनेक वन्यजीवांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे यात एक बिबट, एक रानगवा याचा मृत्यू, तर एक वाघ गंभीर जखमी झाला. यावर आळा घालण्यासाठी वनविभागाने वनक्षेत्रातून जाणाऱ्या मार्गावर गतिरोधक तयार केले. ताडोबा व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार पद्मापूर-मोहर्ली-काटवल या रस्त्यावर 47 गतिरोधक तयार केले आहेत. तर या क्षेत्रातील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गतिरोधकांची संख्या 63 आहे. परिणामी या गतिरोधकांमुळे गावकऱ्यांचा प्रवासाचा वेळ वाढला आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याेच गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
खासदारांच्या चर्चेनंतरही तोडगा निघाला नाही-
येथील गावकऱ्यांना अनेक कारणांसाठी चंद्रपुरात यावे लागते अनेक गोष्टींसाठी त्यांना हा प्रवास करावा लागतो. या गतिरोधकांमुळे पूर्वीपेक्षा दुप्पट वेळ प्रवासामध्ये जात आहे. मात्र, एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठ्या समस्येचा सामना करावा लागत असल्याच्या अडचणी ग्रामस्थांनी सांगितल्या. मात्र, वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी बफरझोनमध्ये या उपाययोजना गरजेच्या असल्याचे स्पष्टीकरण ताडोबा व्यवस्थापनाकडून दिले जात आहे. याच दरम्यान मुधोली येथील महिला सरपंचाचा याच गतिरोधकांमुळे गर्भपात झाला, असा दावा करण्यात आला. त्यानंतर हा वाद आणखी उग्र झाला. शुक्रवारी 15 गावातील सरपंचांनी खासदार बाळू धानोरकर भेट घेऊन याबाबत चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व सरपंच आणि ताडोबातील संबंधित अधिकारी यांची बैठक पार पडली. यात गतिरोधकांचा मुद्दा उपस्थित झाला. ताडोबा व्यवस्थापन आणि गावकरी आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने त्यात कुठलाही ठोस तोडगा निघाला नाही.
वन विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे बोट-
याच दरम्यान रविवारी बफर क्षेत्रातील मुधोली येथील चेतन जीवतोडे या 15 वर्षीय मुलाला सर्पदंश झाला. त्याला उपचारासाठी मुधोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, तब्येत गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू गतिरोधकांच्या अडथळ्यांमुळे झाला असा आरोप मृतकाचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी केला. जर गतिरोधाक नसते तर वेळेवर पोहोचता आले असते, त्यामुळे त्याच्या मृत्यूला गतिरोधक हे कारण असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमवारी याचा उद्रेक झाला. सोमवारी या मुलाचा मृतदेह थेट ताडोबा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आणून गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यासंबंधात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा मृत्यू प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराच्या हलगर्जीपणामुळे झाला, असा दावा केला. आरोग्य केंद्राच्या अपयशामुळे मोहर्ली पोचण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले.
काय आहे ताडोबा व्यवस्थापनाचे म्हणणे-
या एकूणच प्रकरणाबाबत ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या व्यवस्थापनाने प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्टीकरण दिले. 'पद्मापूरपासून समोर मोहर्ली आणि काटवलपर्यंत डांबरी रस्ता आहे. पर्यटक आणि गावकऱ्यांसाठी हा मुख्य मार्ग आहे. या रस्त्यावर काही उत्साही लोक मनोरंजनासाठी देखील येत असतात. वाहन भरधाव चालविली जातात. 2017 पासून आतापर्यंत असे अनेक अपघात झाले आहेत. यात वन्यजीवांचा झालेला मृत्यू ही चिंतेची बाब आहे. यावर आळा घालण्यासाठी पद्मापूरपासून काटवनपर्यंत 47 गतिरोधक तयार करण्यात आले. दोन गतिरोधकांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्यात आले आहे. तसेच वाहनांना कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये, याची दक्षता देखील घेण्यात आली आहे. या गतिरोधकांमुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले असून वन्यजीवांचा मृत्यू देखील झाला नाही. 13 जूनला चेतन जीवतोडे या मुलाला सर्पदंश झाला, त्यानंतर एक तासांपर्यंत त्याच्यावर कुठलाही उपचार झाला नाही. तब्येत बिघडल्याने त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे त्याच्यावर जवळपास एक तास उपचार करण्यात आले. नंतर त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र याच दरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने त्याचा वाटेत मृत्यू झाला. प्रत्यक्षात मुलाचा मृत्यू आणि गतिरोधकांचा अडथळा याचा काहीही संबंध नाही. मात्र काही लोक असा गैरसमज पसरवत आहेत, गावकऱ्यांत संभ्रम निर्माण करीत आहेत, असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
मुलाच्या उपचारात कुठलाही कसूर नाही - आरोग्य विभाग
या घटनेत काहींनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीपणावर देखील बोट ठेवले. मात्र या आरोपात कुठलेही तथ्य नाही, असे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गेहलोत यांच्या म्हणण्यानुसार या मुलाला विषारी नागाने दोनदा चावा घेतला होता. त्यामुळे आधीपासूनच त्याची स्थिती गंभीर होती. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषांनुसार सर्पदंशावर उपचार म्हणून लागणारी सर्व औषधी येथे उपलब्ध होती. ती मुलाला देण्यात आली. औषधांची रुग्णावर काय प्रतिक्रिया होते हे बघण्यासाठी 10 मिनिटे वाट बघावी लागते. त्यानंतर लगेच मुलाला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. अशा रुग्णाला स्थिर करण्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेतूनच मुलाला नेण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र, आरोग्य विभागाकडून यात कुठलाही हलगर्जीपणा केला गेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले.