चंद्रपूर - निष्ठावंत कार्यकर्ता हा भाजपचा आत्मा आहे. तो नाराज झाल्याचे कधीही चालणार नाही. आम्ही यावर चिंतन करून त्यांना योग्य ती जबाबदारी देण्याचा प्रयत्न करू, असे वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यातील अनेक नेत्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी भाजपचे स्थानिक नेते नाराज आहेत. काही ठिकाणी बंडखोरीसुद्धा झाली. यावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना योग्य ती संधी देऊ. काहींना विधानपरिषद तर काहींना राज्यसभेची उमेदवारी देऊ, असेही मुनगंटीवार म्हणाले.
आमदारकी म्हणजे सर्व काही नाही
माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री बावनकुळे, एकनाथ खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. यावर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. उमेदवारी दिली नाही म्हणजे ते सक्षम नाहीत असा अर्थ होत नाही. त्यांच्यासाठी पक्षाने काही वेगळा विचार केला असावा, असेही मुनगंटीवार म्हणाले.