चंद्रपूर - पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या भावनिक आवाहनाने जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या 16 वर्षीय 'ग्रेटा थनबर्ग' या स्वीडिश युवतीच्या आवाहनाला चंद्रपूरच्या तरुणाईने साथ दिली आहे. पर्यावरणीय बदल हा मुद्दा चंद्रपुरात केंद्रस्थानी आणण्याचा निर्धार युवा कार्यकर्त्यांनी केला आहे.
पर्यावरणाच्या बदलाने होणाऱ्या समस्येवर आवाज उठवणाऱ्या व 16 वर्षीय स्वीडिश पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गने अवघ्या जगाचे लक्ष वेधले. तिच्या या प्रयत्नांना चंद्रपूरच्या युवकांची देखील साथ मिळाली आहे. आपल्या भावनिक संबोधनाने ग्रेटाने भविष्यात घोंगवणारे संकट ठसठशीतपणे पुढे ठेवले. तिच्या मुद्द्यांना समर्थन देण्यासाठी जगभर 'क्लायमेट स्ट्राईक' अभियान राबविले जात आहे.
हेही वाचा - प्रतिनोबेल म्हणून ओळखला जाणारा 'राईट लाईव्हलीहूड' पुरस्कार 16 वर्षीय ग्रेटा थनबर्गला जाहीर
या विषयावर लक्ष वेधण्यासाठी चंद्रपुरच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण-प्लास्टिक बंदीसाठी शहरात जनजागृती रॅली काढली. शहरातील रामाळा उद्यान नेकलेस रोडवर आयोजित रॅलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चंद्रपूर शहर नेहमीच देशातील अति प्रदुषित शहरांच्या यादीत सामील असतो. या शहराचा पर्यावरणाचा मुद्दा नेहमीच गंभीर राहिला आहे. याच विषयावर ठोस जनजागृती करण्याचा निर्धार येथील युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. प्रचंड तापमान, लहरी पाऊस, शेतीवरील संकट, साथरोगांचे वाढलेले प्रमाण, गोठविणारी थंडी अनुभवणाऱया चंद्रपूरकरांना ग्रेटाचा आवाज म्हणजे स्वतःचा प्रतिध्वनी वाटू लागला आहे. तर, विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला शहरातही चांगला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा - जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रातील विद्यार्थ्यांचे पर्यावरणासाठी आंदोलन