राजूरा (चंद्रपूर)- गोंडपिपरी तालुक्यात सीसीआय मार्फत कापूस खरेदी बंद असल्याने खासगी जिनिंग मालकाकडून कवडीमोल भावात कापूस खरेदी सुरू आहे. क्लिटंनमागे बाराशे रुपयाचा तोटा शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबवा, सीसीआय केंद्र सुरू करा, अशी हाक बळीराजा देत आहे.
हेही वाचा- कोरोनाबाधित पत्रकाराच्या संपर्कात आल्याने कर्नाटकातील पाच मंत्र्यांची चाचणी
लॉकडाऊनच्या काळात बळीराजा अडचणीत सापडला आहे. एक ते दीड महिन्यापासून खाजगी जिनिंग बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून होता. बाजार समितीच्या पत्रव्यवहारानंतर खाजगी जिनिंग सुरू झाल्यात. मात्र, कापसाला अत्यल्प भाव असल्याने बळीराजाचा अडचणीत सापडला आहे.
गोंडपिपरी तालुक्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. यांनी कापूस खरेदीसाठी वृंदावन जिनिंग अँड प्रेसिंग इंडस्ट्रीज नवेगाव या जिनिंगची कापूस खरेदी केंद्रासाठी निवड केली. मात्र, सध्या कापूस खरेदी बंद आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने शेती मशागत, बि-बियानाची जूळवाजूळव करण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे. हातात पैसा नसल्याने बळीराजा कापूस विक्रीसाठी खाजगी जिनिंग गाठीत आहे. पण शेतकऱ्यांचे पांढरे सोने कवडीमोल भावात खरेदी केले जात आहे. या प्रकाराने बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, सीसीआय केंद्रामार्फत कापूस खरेदी करावी, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती अशोक रेचनकर यांनी केली आहे.