चंद्रपूर : भारतातील सर्वात समृद्ध आणि उत्कृष्ट असे सागवान चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यात आढळून येते. ब्रिटिश काळापासून या सागवानाची भुरळ सर्वांना पडली आहे. येथील सागवान हे ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ हिच्या बकिंगहम पॅलेस या राजवाड्यात देखील सजविण्यात आले आहे. यानंतर नव्याने बनणारी संसद म्हणजे सेंट्रल विस्टा तर आता अयोध्या येथे निर्माण होणाऱ्या भव्य राम मंदिर निर्माणसाठी येथील सागवानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे चंद्रपूर येथील सागवान आणि त्याचे वैशिष्ट्य पुन्हा चर्चेस आले आहे.
चंद्रपूरातील दर्जेदार सागवान : जागतिक दर्जाचे सागवान जगातील सर्वोत्कृष्ट सागवान हे ब्रह्मदेशाच्या जंगलात आढळते. मात्र, येथील जंगल हे विरळ आहे आणि सागवान देखील कमी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे उत्कृष्ट दर्जाचे सागवान हे भारतातील चंद्रपूर-आलापल्लीच्या जंगलामध्ये आढळते. येथील सागवानाला तपकिरी सागवान किंवा ब्राऊन टिक नावाने ओळखले जाते.
हे आहे वैशिष्ट्य : या भागातील सागवानाला उधळी लागत नाही आणि पाण्यानेही याला काही फरक पडत नाही. शेकडो वर्षे हे लाकूड कायम राहू शकते. चंद्रपूरच्या जंगलातील वैशिष्ट्य म्हणजे हे जंगल उष्णकटिबंधीय पानझडी प्रकारचे जंगल आहे. सागवनासाठी हे वातावरण अतिशय पोषक असे आहे. त्यामुळे भारतातील सर्वात मोठे सागवानाचे वृक्ष येथेच आढळतात. केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून या सागवानाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
ऑनलाईन लावली जाते बोली : आलापल्ली येथून आणलेले सागवान हे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर महाराष्ट्र वन विकास महामंडळ येथे संग्रहित केले जाते. सध्या येथे 50 हजार घनमीटर फूट एवढा लाकडांचा साठा आहे. यामध्ये 20 हजार घनमीटर फूट सागवानाचा समावेश आहे. एक ते सहा या स्तरापर्यंत या सागवान किंवा लाकडाची किंमत ठरविली जाते. ऑनलाइन लिलावाच्या माध्यमातून या लाकडांची बोली लावून हे लाकूड विकल्या जाते. रविवार वगळता सहाही दिवस ही ऑनलाइन लिलाव सुरू असतो.
असा होतो लिलाव : सागवान लाकडाच्या विक्रीसाठी लाकडांचा लिलाव हा ऑनलाईन पद्धतीने होतो. यासाठी एक निश्चित किंमत ठरवून लाकूडसाठा लिलावात आणल्या जातो, तसेच हा लिलाव कधी होणार याचा वेळ देखील वनविकास महामंडळाच्या संकेतस्थळावर दिला जातो. तीन मिनिटांपर्यंत हा ऑनलाइन लिलाव चालतो. ज्याची सर्वाधिक बोली त्याच्या मालकीचा हा माल होतो. तीन मिनिटे पूर्ण झाल्यानंतर तीस सेकंदाचा आणखी अतिरिक्त वेळ दिला जातो. या 30 सेकंदामध्ये जर वरची बोली लागली नाही तर हा लिलाव इथेच जाहीर केल्या जातो. अन्यथा दर 30 सेकंदाप्रमाणे हा लिहिला पुन्हा वाढत जातो.
महामंडळाची उलाढाल : आलापल्ली (गडचिरोली) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान बल्लारपूर वनविकास महामंडळात येत असून या सागवानाला देशभरातून मोठी मागणी असल्याने या महामंडळाची उलाढाल ही शेकडो कोटींच्या घरात आहे. 2021-22 या वर्षी 165 कोटींची उलाढाल या महामंडळातून झाली होती तर 2022-23 मध्ये आतापर्यंत 140 कोटीचे लाकूड विकल्या गेले आहे. जानेवारी महिन्यात आतापर्यंतची सर्वात महाग किमतीमध्ये सागवान लाकूड विकल्या गेले. तब्बल तीन लाख प्रति घनमीटर याप्रमाणेची बोली लावण्यात आली आणि यात कोट्यावधींची उलाढाल झाली.
अयोध्येतील राममंदिरासाठी सागवान : अयोध्या येथे निर्माण होणारे भव्य राम मंदिर हे किमान हजारो वर्ष टिकावे, या उद्देशाने त्याचे निर्माण केले जात आहे. यासाठी 1855 घनफूट इतके सागवान अयोध्या येथे पाठवले जाणार आहे, याची किंमत 1.32 कोटी इतकी होत आहे. ला लाकडाचे भूगतान एल अँड टी कंपनी करणार आहे.