चंद्रपूर - संपूर्ण राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांसाठी शासकीय जम्बो कोविड रुग्णालये उभारण्यात येत आहेत. मात्र, चंद्रपुरात अशी आपत्ती ओढवली असताना राज्याचे आपत्ती व व्यवस्थापनमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात एक भन्नाट असा अभिनव प्रयोग करण्यात येत आहे. येथे श्रीमंतांसाठी चक्क 700 खाटांचे प्रशस्त असे खासगी कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. यातील एकही बेड सर्वसामान्य रुग्णांना मिळणार नाही. ज्यांच्या खिशात बक्कळ पैसा आहे, असेच कोरोना रुग्ण येथे उपचार घेऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे हे कोविड सेंटर उभारण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून त्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. याबाबत जनमानसात तीव्र संतापाची लाट दिसून येत आहे.
कोरोनावरील नियंत्रणात चंद्रपूर जिल्हा हा राज्यात अव्वल असताना केवळ राजकीय हव्यासापोटी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची बदली करून कोरोनाचा जुगार खेळण्यात आला. याला पालकमंत्री वडेट्टीवार यांची मुकसंमती होती. शेवटी व्हायचे तेच झाले. पालकमंत्री बोले आणि प्रशासन चाले, अशी गत आहे. डॉ. खेमणार यांनी योग्य समन्वयातून विविध विभागांचे नेटवर्क तयार केले ते उद्ध्वस्त झाले. आरोग्य विभाग आणि सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता तो पूर्णपणे तुटला. म्हणूनच कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला की नातेवाईक आता आरोग्य यंत्रणेला दोषी धरत आहेत. अशा अनेक घटनांत कमालीची तणावाची स्थिती निर्माण झाली. एक दोन घटनात तर थेट डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला. तर दुसरीकडे हे डॉक्टर देखील हतबल आहेत. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेपायी पुरेसे डॉक्टर आणि पुरेसे मनुष्यबळ नेमण्यातच आले नाही. आजच्या घडीला 40 खाटांच्या अतिदक्षता विभागात कोरोनाच्या रुग्णांसाठी केवळ एक डॉक्टर आणि दोन परिचारिका आहेत. ते सुद्धा अर्धवेळ. यामुळे अतिदक्षता विभागच व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे नागपूर निवासी पालकमंत्री वडेट्टीवार हे आठवड्यातुन एकदा चंद्रपूरला भेट देतात. आढावा घेतात, निर्देश देतात आणि निघून जातात. मग पुढे फारसं काही होत नाही.
हेही वाचा - कोरोनाच्या उपाययोजनांसाठी जन विकास सेनेचा 'दहा कलमी प्रस्ताव'; नियम शिथिल करण्याची मागणी
15 ऑगस्टला वडेट्टीवार यांनी आणीबाणीच्या प्रसंगासाठी चारशे खाटांचे शासकीय जम्बो कोविड रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश दिले. यासाठी उपयुक्त अशी जागा पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाला याचा प्रस्ताव देण्याचे आदेश देण्यात आले. सोबत तुटवडा भासू नये म्हणून ऑक्सिजन जनरेशन प्लांट स्थापित करण्याच्या सूचना देखील वडेट्टीवार यांनी दिल्या. आज एक महिन्याचा काळ लोटला तरी ना प्लांट तयार झाले, ना शासकीय जम्बो कोविड रुग्णालय. उलट आरोग्य यंत्रणा रसातळाला गेली. आजच्या घडीला सामान्य नागरिकांना बेड मिळण्यासाठी दोनदोन दिवस वाट बघावी लागत आहे. अशा 'आपत्ती'च्या काळात काही नेते, अधिकारी आणि व्यापाऱ्यांनी आपले उत्तम 'व्यवस्थापन' करून संधी शोधली. शहरातील शकुंतला फार्म येथे श्रीमंत लोकांसाठी तब्बल सातशे बेडचे कोविड केअर रुग्णालय उभारण्याचा घाट घालण्यात आला. विशेष म्हणजे अशाप्रकारे पूर्णपणे खासगी जम्बो कोविड केअर देशात आणि राज्यात पहिल्यांदाच होत आहे.
हेही वाचा - आशा स्वयंसेवीकांच्या लढ्याला यश; प्रतिबंधात्मक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मिळणार प्रतिमाह चार हजार मानधन
शहरातील एका डॉक्टरचा चेहरा पुढे करून मनपाला परवानगी मागण्यात आली. मनपाने देखील या संधीचे 'सोने' करीत सर्व नियम धाब्यावर बसवून परवानगी दिली. आज या रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. श्रीमंतांची सोय झाली तर सर्वसामान्य रुग्णांसाठी आपोआपच शासकीय बेड उपलब्ध होतील, असा केविलवाणा तर्क या खासगी रुग्णालयाचे समर्थन करणारे नेते देतात, हे त्याहूनही संतापजनक आहे. त्यातही भविष्यात कोरोनाची स्थिती आणखी किती भयावह होणार आहे, याचे फुगवून आकडे सांगत आपल्याच नाकर्तेपणाचे पुरावे नेते आणि प्रशासन देत आहे. त्यामुळे खासगी जम्बो रुग्णालय किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देणे त्यामागचा उद्देश. मात्र, जनतेत याबाबत कमालीचा संताप आहे. शासकीय यंत्रणा सक्षम करण्याऐवजी धनाढ्यांसाठी ही सोय केली जात असेल तर सामान्य रुग्णांनी कुठे जायचे हा त्या मागचा प्रश्न आहे. या मुद्यांवर आता आम आदमी पक्षाच्या अॅड. पारोमिता गोस्वामी आणि जनाविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मोर्चा उघडला आहे. याची दखल पालकमंत्री वडेट्टीवार घेतात की त्याकडे दुर्लक्ष करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.