चंद्रपूर - ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी विषारी इंजेक्शन घेतल्याचे समोर आले आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला आहे. येथे विशेष फॉरेन्सिक टीमकडून शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.
गौतम करजगी यांच्याशी लग्न -
शीतल आमटे यांनी अभियंता आणि व्यवस्थापन तज्ज्ञ गौतम करजगी यांच्याशी लग्न केले आहे. ते वरोरा येथील महारोगी सेवा समितीचे विश्वस्त आहेत आणि व्यवस्थापन व आनंदवन स्मार्ट व्हिलेज प्रकल्प पाहतात. त्यांना एक 5 वर्षाचा मुलगा शार्विल आहे.
काही दिवसांपूर्वी केले होते फेसबुक लाइव्ह -
डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. त्यानंतर दोन तासातच त्यांनी फेसबुक लाइव्ह डिलीट केलं होतं. फेसबुक लाइव्हनंतर चर्चांना उत आल्यानंतर आमटे कुटुंबांकडून निवेदन जारी करण्यात आले होते. त्यामाध्यमातून शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.
हेही वाचा - बाबा आमटेंची नात, आनंदवन प्रमुख डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या; राहत्या घरी घेतले विषारी इंजेक्शन