चंद्रपूर- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरता सात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही शहरांचा विकास होणार आहे. स्विमिंगपूल, उद्यानाचे सौंदर्यीकरण, जिम तसेच नगरपंचायतीच्या इमारतीच्या बांधकामासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.
वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत नगरविकास मंत्रालयाने हा निधी मंजूर केला आहे. ब्रम्हपूरी नगरपरिषद परिसरात स्विमिंगपुल व उद्यानासाठी अडीच कोटी, सिंदेवाही नगरपंचायतच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी तीन कोटी, तर सावली नगरपंचयातीच्या उद्यान व ग्रीन जिमसाठी दीड कोटी याप्रमाणे सात कोटी रूपये निधी 1 जुलैच्या परिपत्राकान्वये मंजूर करण्यात आला आहे.
ब्रम्हपूरी शहरातील परिसरामध्ये स्विमिंग पूलाचे बांधकाम करण्याच्या संदर्भात परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती. ती आता पूर्ण होणार आहे. याच प्रकारे सावली नगरपंचायतीचा देखील विकास होणार आहे. पूर्वी या शहराला ग्रामपंचायतीचा दर्जा होता. मात्र वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने ती बरखास्त करून नगरपंचायतीला मंजुरी देण्यात आली. आता येथे उद्यान व जिमच्या बांधकामासाठी 1 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
सिंदेवाही ग्रामपंचायतीला देखील नगरपंचायतिचा दर्जा देण्यात आला. मात्र, अजूनही याचे कामकाज ग्रामपंचायत इमारतीत सुरू आहे. आता नगरपंचायतीच्या इमारतीला मंजुरी मिळाली असून तीन कोटींच्या निधीतून इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. या दूरदृष्टीच्या निर्णयाबद्दल वडेट्टीवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.