चंद्रपूर - वन्यप्राणी आणि मानवांचा संघर्ष टाळण्यासाठी वाघांच्या स्थानंतराचा प्रस्तावावर अभ्यास सुरू असून या विषयाचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. येत्या काळात ज्या क्षेत्रात वाघांची संख्या जास्त आहे, त्या भागांतील वाघ राज्याच्या इतर जंगलात स्थानांतरित करण्यासंदर्भांत हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या विषयावर प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर वाघांना स्थलांतर करता येईल का, याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सकारात्मक अहवाल दिल्यास कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक वाघ असल्याची नोंद आहे. सध्या महाराष्ट्रात 312 वाघांची नोंद असून त्यापैकी अर्धे वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या 160 वाघ आहेत. तर शेजारच्या परिसरात 12 वाघ आहेत. त्यामुळे वाघ आणि मानव संघर्षाच्या अनेक बातम्या पुढे येत असतात. हा संघर्ष टाळण्यासाठी येणाऱ्या काळात ताडोबा येथील वाघांचे राज्यातील इतर जंगलात स्थलांतर केले जाण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांना यासंबधी अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून यामध्ये वाघांसाठी पोषक वातावरण, शिकारीची उपलब्धता, जंगलाचा विस्तार यासारख्या अनेक बाबींवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.