चिमूर (चंद्रपूर) - शहराजवळील कवडशी जंगल क्षेत्रात सुरु असलेल्या अवैध दारू हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. त्यात पोलिसांनी मोहदारू, फुलांचा सडवा आणि हातभट्टीचे साहित्य असा एकुण 4 लाख 62 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर घटनास्ळाथवरून दोन संशयित आरोपी पसार झाले.
कवडशी जंगल क्षेत्रात हातभट्टी लावून मोठ्या प्रमाणात दारू निर्मिती होत असल्याची गोपनीय माहीती चिमूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन बगाटे यांच्या नेतृत्वात चिमूर पोलिसांनी धाड टाकली. कारवाईची चाहूल लागण्याने दोन संशयित आरोपी राहुल रामटेके व प्रशांत शंभरकर पसार होणास यशस्वी झाले. चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्राचा फायदा घेऊन हातभट्टी लावून मोह दारूची निर्मिती केली जाते. देशी-विदेशी दारू पेक्षा सहज व स्वस्त दरात हातभट्टीची दारू मिळत असल्याने शौकीनांचा याकडे कल वाढला आहे. या हातभट्टीची गोपनीय माहितीनुसार कवडशी जंगल क्षेत्रात धाड टाकण्यात आली. घटनास्थळावर चिमूर पोलिसांना १ लाख ८० हजार रुपयाची १५० लिटर मोहादारू, २ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मोहा सडवा व हातभट्टी करिता उपयोगाचे लोखंडी शेगड्या, लोखंडी व प्लॅस्टीक ड्रम, जर्मन कुंडे, लोखंडी पिपे इत्यादी साहित्यासह एकुण ४ लाख ६२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन बगाटे (IPS) यांचे नेतृत्वात पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, पोलीस अंमलदार कैलास आलाम, प्रविण गोन्नाडे, मनोज ठाकरे, शंकर बोरसरे यांचा सहभाग होता. तर फरार आरोपी विरोधात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाकल करण्यात आला.