चंद्रपूर - 'जेवनात मटण हवे, खोलीत कुलर हवा आणि आम्हाला आमच्या जीवाची हमी पण तुम्ही द्या' गावातील शाळेत क्वारंटाईन केलेल्या मजूरांच्या या अटी एकूण ग्रामपंचायत सदस्यासह सर्वच आश्चर्यचकित झाले. आपण या मागण्या पूर्ण करु शकत नसल्याचे ग्रामपंचायतीने कबूल केले. शेवटी अटींची पुर्तता होत नसल्याने मजूरांनी देखील गावतील आपले घर गाठले. हा प्रकार आहे गोंडपिपरी तालूक्यातील सोमणपल्ली या गावातील.
तेलंगणातून गावी परतलेल्या मजूरांना ग्रामपंचायतीने गावाबाहेर असलेल्या शाळेच्या इमारतीत क्वारंटाईन करण्याचे ठरवले. सुरुवातीला मजूरांनी शाळेच्या इमारतीत रहायला नकार दिला. मात्र, नंतर ते तयार झाले. परंतु त्यांनी सोईसुविधा म्हणून ग्रामपंचातीकडे काही मागण्या केल्या. त्यांच्या या मागण्या पाहून सरपंचासह सर्वांनीच हात जोडले. शेवटी या मजूरांचे आता त्यांच्या राहत्या घरीच विलगीकरण करण्यात आले असून त्यांची तिथेच वैद्यकीय तपासणी सूरु असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
हेही वाचा... 'ग्राहक ही भगवान होता है', बेळगावात दुकानदाराने केले तळीरामाचे हार घालून स्वागत
तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो मजूर गेले होते. त्यात गोंडपिपरी तालूक्यातील शेकडो मजूरांचा समावेश होता. तब्बल दीड महीन्यांनंतर या मजूरांनी महाराष्ट्रात पाय ठेवला आहे. त्यानंतर मजूरांनी गाव गाठले. मात्र, शासनादेशाप्रमाणे ते घरापासून दूर आहेत. खबरदारी म्हणून स्थानिक प्रशाशनाने गावाबाहेर या मजूरांचे विलगिकरण केले आहे. गोंडपिपरी तालूक्यातील सोमणपल्ली येथील 34 मजूरांना देखील गावापासून लांब असलेल्या शाळेच्या इमारतीत ठेवण्यात आले होते.
सुरवातीला या मजूरांनी शाळेच्या इमारतीत राहण्यास नकार दिला होता. मात्र, त्यांची समजूत काढल्यानंतर ते तिथे राहण्यास तयार झाले. मजूर तिथे राहण्यास तयार झाले. मात्र, त्यांनी काही अटी ग्रामपंचायतीकडे ठेवल्या होत्या. जेवनात दररोज मटण हवे, थंड हवेसाठी खोलीत कुलर हवा. इतकेच नाही तर, ग्रामपंचायतीने त्यांच्या जीवाची हमी घ्यावी, असेही या मजूरांनी म्हटले. मजूरांचा या अटी ऐकून ग्रामपंचायतीचे डोके गरगरले. अखेरीस ग्रामपंचायतीने मजूरांपुढे हात जोडले. त्यांच्या अटींची पुर्तता करण्यास असमर्थता दाखवली. अटींची पुर्तता होत नसल्याने मजूरांनी देखील शाळा इमारती सोडून थेट घर गाठले. सध्या हे मजूर त्यांच्या घरीच क्वारंटाईन असून ग्रामपंचायतीने त्यांना मास्क, साबण दिले आहे. तसेच आरोग्य विभागाकडून या मजूरांची नियमित आरोग्य तपासणी सूरु आहे.