चंद्रपूर - कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. आजवर बाहेरून आलेले संसर्गग्रस्त निघत होते. मात्र संसर्ग वाढला आहे. यातच 'मूल'सारख्या ठिकाणी एका राइस मीलमध्ये काम करणाऱ्या तब्बल 24 परप्रांतीयांना कोरोना झाल्याचे समोर आले. प्रशासनाकडून या राइसमिलबाबत माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे सातत्याने देण्यात आली.
आता याच प्रकारची घटना चंद्रपूर एमआयडीसी परिसरातील एका प्रतिष्ठित कंपनीत घडलीय. आधी दोन आणि त्यांच्या संपर्कात आलेले चार असे सहा कोरोनाग्रस्त कर्मचारी या कंपनीचे सापडले आहेत. मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीही माहिती प्रसिद्धीपत्रकातून अद्याप देण्यात आलेली नाही. या प्रकरणावर आता प्रश्न उभे राहत आहेत.
तर दुसरीकडे या कंपनीविरोधातील रोष अणखी तीव्र होऊ लागलाय. जवळपासच्या गावकऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने ही कंपनी काही दिवसांसाठी बंद करण्याची मागणी केली आहे. तर शिवसेनेच्या कामगार शाखेने कोरोनाग्रस्तांची माहिती लपवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. केवळ कंपनीच्या प्रतिष्ठेसाठी कामगारांचा जीव धोक्यात घालण्यात येत तर नाही ना? असा गंभीर प्रश्न या एकूण परिस्थितीतून निर्माण होत आहे.
चंद्रपूर एमआयडीसी परिसरात रसायन तयार करणारी एक प्रतिष्ठित कंपनी आहे. पर्यावरणाचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली ही कंपनी आधिच वादग्रस्त ठरली होती. या कंपनीचे सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची सध्या माहिती मिळत आहे. पहिल्या दोन जणांच्या संपर्कात येऊन आणखी चार जणांना बाधा झाली. यामध्ये काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. आधी सापडलेले कोरोना रुग्ण तब्येतीच्या तक्रारीमुळे गैरहजर असायचे अशी माहिती कंपनी व्यवस्थानाकडून देण्यात आली.
एखादा रुग्ण सापडल्यानंतर त्याबाबत अन्य सर्व जिल्हा प्रशासनाच्या विभागाकडून माहिती जाहीर केली जाते. संबंधित रुग्णाच्या प्रवासाचा तपशील, वास्तव्य करत असेला परिसर,आदी सर्व माहिती प्रसिद्धीपत्रकातून कळवण्यात येते. मूल येथील राइसमिलमध्ये 24 कामगार कोरोनाग्रस्त आढळल्याचे याच माध्यमातून समोर आले. मात्र एका कंपनीत सहा कोरोनाग्रस्त आढळतात; त्याची माहिती प्रसिद्ध केली जात नाही, ही बाब अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.
कंपनीकडून कोरोनाग्रस्तांची माहिती दडवण्यात येत आहे. कामगारांची सुरक्षा दावणीला बांधून कंपनीचे काम सुरू आहे. प्रशासनही याची माहिती दडवत आहे, असा गंभीर आरोप शिवसेना कामगार शाखेचे बंडू हजारे यांनी केला आहे. या प्रकारणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.