चंद्रपूर - सावली तालुक्यातील पेटगाव येथील आठ शेतमजूर वरोरा तालुक्यात हरभरा कापण्यासाठी गेले होते. मात्र कोरोना संसर्गामुळे सरकारने देशभरात संचारबंदी घोषीत केल्याने ते अडकून पडले. त्यामुळे संचारबंदीत हे मजूर पायी वरोऱ्याकडे निघाले होते. चिमूरला पोलिसांनी या कुटुंबीयांना अडवल्यानंतर त्यांनी आपबीती कथन केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या भोजनासह राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर वाहनाने त्यांना घराकडे रवाना केले. पोलिसांच्या खाकीतील माणुसकी पाहून हे मजूर भारावून गेले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात संचारबंदी घोषित करण्यात आली. त्यामुळे गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, यांचे जीवन मरणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मूल, सावली, सिंदेवाही येथील शेतमजूर धानपीक निघाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी जिल्ह्यातील वरोरा किंवा लगतच्या वर्धा किंवा यवतमाळ जिल्ह्यापर्यंत कामासाठी जातात. मात्र संचारबंदीमुळे रोजंदारीसाठी स्थलांतरीत केलेल्या शेतमजुरांवर बिकट परिस्थिती येऊन पडली. मजूर कामाच्या ठिकाणी अडल्याने घराची ओढ व कुंटुंबाची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे अनेक शेतमजूर पायीच गावाकडे निघाले.
सावली तालुक्यातील पेटगाव येथीलही आठ शेतमजूर वरोरा तालुक्यात हरभरा कापायला गेले होते. मंगळवारी सायंकाळी वरोऱ्यावरून चिमूरमार्गे पेटगावला जाण्यासाठी पायी निघाले. मध्यरात्री चिमूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी पायी येताना शेतमजूर आढळले. यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांनी याबाबतची माहिती तहसीलदारांना दिली. त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी बुधवारी त्या सर्व मजुरांना वाहनाने त्यांच्या गावी रवाना केले. खाकीतील या माणुसकीचा ओलाव्याने भारावलेल्या शेतमजुरांनी पोलिसांचे आभार मानले.