चंद्रपूर - जिल्ह्यातील मूल येथील वनकर, दुर्गे यांच्यासह ११ जणांच्या शेतात घुसून शेतमालाचे नुकसान करून दलित कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, १२ दिवस उलटून देखील एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पीडित कुटुंबीयांनी योग्य न्याय देण्याची मागणी पत्रकारपरिषदेत केली.
मूल तालुक्यातील चक दुगाळा येथे बाबाजी संभाजी वनकर, मारोती ओंडुजी दुर्गे यांच्यासह ११ जणांचे शेत आहे. सर्वजण 1972 पासून वनजमिनीवर अतिक्रमण करून ते आपला उदरनिर्वाह करीत आहेत. वनविभागाच्या अधिनियम 2006 अन्वये ग्रामपंचायत चक दुगाळा आणि ग्रामपंचायत बेंबाळ यांच्या ग्रामसभेच्या ठरावानुसार कायमस्वरूपी पट्ट्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दावा दाखल केला आहे. म्हणजेच त्यांचे हे अतिक्रमण नियमानुसार व कायद्याला धरून आहे. यावर्षी सर्व पीडित कुटुंबाने आपल्या शेतीत धान, तूर व कापूस पीकांची लागवड केली आहे.
गेल्या 17 जुलैला काही समाजकंटकांनी हेतूपुरस्पर त्यांच्या शेत जमिनीवर येऊन त्यांच्या पिकाची नासधुस केली. यामध्ये मूल पंचायत समितीचे उपसभापती चंदू मारगोनवार आणि त्यांच्यासोबत आणखी १६ लोके लोक होते. मारगोनवार यांच्या सांगण्यावरूनच पीडित कुटुंबीयाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली, असे त्यांचे म्हणणे आहे. यामध्ये मारुती ओंडूजी दुर्गे आणि त्यांच्या पत्नी, तसेच संभाजी वनकर यांच्यासह त्यांच्या पत्नीला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून त्यांना बेशुद्ध होइपर्यंत मारण्यात आले. विशेष म्हणजे मारहाण झालेले चौघांचेही वय 70 ते 75 दरम्यान आहे. त्यांना मारहाण झाल्यामुळे त्यांच्या हाताचे हाड देखील मोडले आहे. याप्रकरणी त्यांनी मूल पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, पोलिसांनी मुख्य आरोपी चंदू मारगोनवार आणि अन्य ११ लोकांची नावे वगळली आणि केवळ पाच लोकांवरच गुन्हा दाखल केला आहे.
अॅट्रॉसिटीसारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद होऊन देखील तब्बल १२ दिवस लोटूनही एकाही आरोपीला अटक केलेली नाही. केवळ राजकीय दबावापोटी या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे सर्व १७ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी अन्यथा त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यातचा इशारा आरपीआयचे गोपाल रायपूरे आणि बाजीराव उंदीरवाडे यांनी दिला आहे.