चंद्रपूर - राजूरा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी मंगेश मधुकर जक्कुलवार यांनी रेल्वे उड्डाणपुलाखाली विष पिऊन आत्महत्या केली होती. यानंतर मृत शिपाईचा पत्नीने ठाणेदाराने घरात घुसून कुटुंबासमोर पतीला मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच ठाणेदारावर कारवाई होईपर्यंत शवविच्छेदन करणार नसल्याची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी एक तास रास्तारोको करण्यात आला. अखेर पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण निवळले.
राजूरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे मंगेश जक्कुलवार यांनी विष घेऊन आत्महत्या केली. याच पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर कासार यांनी घरात घुसून पत्नीसमोरच संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. हा अपमान पचवू न शकल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका मृताच्या कुटुंबियांनी घेतली आहे.
यासाठी त्यांनी राजुरा-हैदराबाद महामार्ग एक तास रोखून धरला. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले आहे. त्यांनी पत्नीला नोकरी, आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी तक्रार मागे घेतली असून पुढील प्रक्रियेला सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.