चंद्रपूर - वेकोली खाणीत तरुणाला चांगली नोकरी होती. मात्र गुन्हेगारी प्रवृत्ती आणि चोरी करण्याची त्याची वाईट सवय काही गेली नाही. याच कारणामुळे त्याला नोकरी गमवावी लागली. ही सवय त्याने यानंतर देखील कायम ठेवली. संधी मिळाली तर चोरी करायची आणि पसार व्हायचे. याच वाईट सवयीमुळे त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ज्या ठिकाणी त्याने यापूर्वी चोरी केली होती, त्याच ठिकाणी तो पुन्हा चोरी करताना सापडला. प्रतीक उर्फ राहुल धनराज झाडे असे त्या चोराचे नाव आहे.
आरोपी प्रतीक उर्फ राहुल धनराज झाडे हा वेकोली कर्मचारी म्हणून कार्यरत होता. नोकरी गमावल्यावर तो पुन्हा चोरी करायला लागला. चोरी तसेच इतर गुन्हेगारीची प्रकरणे त्याच्या नावावर आहेत. नागपूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यात याची नोंद आहे. त्याने नागपूर, चंद्रपूर येथून अनेक दुचाकी चोरल्या. काही दिवसापूर्वी त्याने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिलेची पर्स चोरली. ज्यात मोबाईल आणि इतर महत्वाची कागदपत्रे होती. याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. तपासात हा आरोपी प्रतीक झाडे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या परिसरात पोलिसांनी पाळत ठेवली.
आज प्रतीक पुन्हा याच ठिकाणी चोरी करायला आला. यावेळी पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. अधिक तपास केला असता त्याने चार दुचाकी आणि मोबाईल चोरल्याचे समोर आले. त्यानुसार हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील दोन दुचाकी नागपूर तर दोन दुचाकी चंद्रपूर येथील आहेत. ही कारवाई शहर पोलीस ठाण्यातील बाबा डोमकावळे, शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, स्वामीदास चालेकार, विलास निकोडे, किशोर तुमराम, वंदिराम पाल यांनी केली. या चोरीच्या सवयीमुळे आरोपीला पुन्हा एकदा कोठडीची हवा खावी लागत आहे.