चंद्रपुर - चिमूर तालुक्यातील मेटेपार येथे एक वाघीण आणि तिचे दोन बछडे असे तीन वाघ मृतावस्थेत आढळून आले आहेत. या वाघांवर विषप्रयोग झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात वनविभागाने एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
चिमूर वनपरिक्षेत्रा अंतर्गत मेटेपार गावालगतच्या नाल्याजवळ तीन वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यात एक वाघीण व तिचे दोन बछडे असून ते आठ ते नऊ महिन्याचे आहेत. मेटेपार गावालगत असलेल्या तलावाकाठी काहीजण जांभळाच्या झाडावरून जांभळं तोडायला गेले होते. त्यांना तेथे वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत आढळले. त्यांनी तात्काळ ही घटना वन विभागाला कळवली. वन विभागाने पाहणी केली असता जवळच एक गाईचे वासरू मृतावस्थेत आढळून आले. त्याचे दोन पाय तुटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे वाघिण आणि तिच्या बछड्यांनी मृत वासरू खाल्ल्याने त्यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत झाल्याची दाट शक्यता आहे.
एका दिवसापूर्वी मेटेपार येतील गावातील कुत्र्यांनी आरोपी पांडूरंग कानबा चौधरी यांचे वासरू ठार केले होते. त्यामुळे या कुत्र्यांना मारण्यासाठी पांडूरंग चौधरी यांनी आपल्या शेतात आंब्याच्या झाडा खाली मृत वासरावर थिमेट टाकून ठेवले होते अशी चर्चा गावात आहे. या वासराला खाल्ल्याने वाघीण आणि तिच्या दोन बचड्यांचा मृत्यू झाला. खडसंगी येथे या तीनही वाघांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.