चंद्रपूर - जिल्हा कारागृहातील एका कर्मचाऱ्यासह 71 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना तुरुंगातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2 हजार 74 आहे तर 1 हजार 176 कोरोनातून बरे झाले आहेत. 873 वर उपचार सुरू आहे. तसेच शनिवारी (दि. 29 ऑगस्ट) 178 बाधितांची नोंद झाली असून आतापर्यंत 25 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा कारागृहात गैबी शाह वली यांचा दर्गाह आहे. या ठिकाणी मोहर्रमचा उत्सव साजरा करण्यात येतो. मात्र, कारागृहातील कर्मचाऱ्यांसह कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. यामुळे यावेळी याठिकाणी उर्स व मोहर्रम साजरा केला जाणार नाही.
जिल्हा कारागृहाचे बराक 1 आणि 2 असे विभाजन केले आहे. नव्या कैद्यांना बराक 1 येथे ठेवण्यात येते. येथे जवळपास 117 कैदी आहेत. त्यापैकी काहींना शनिवारी कोरोनाची लक्षणे जाणवायला सुरुवात झाली. त्यांची अँटीजेन चाचणी केल्यावर ते पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर सर्व 117 कैद्यांची तपासणी करण्यात आली. यात 71 कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तसेच कारागृहातील एक कर्मचारी देखील पॉझिटिव्ह आढळून आला.
जिल्हा कारागृह अधीक्षकांचा बेजबाबदारपणा
राज्यात अनेक ठिकाणी कारागृहातील कैद्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सर्व कारागृहांना सावधानता बाळगण्याचा इशारा दिला होता. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात याचे योग्य पालन झाले नाही, असे दिसून येत आहे. जिल्हा कारागृह अधीक्षक वैभव आगे यांना याबाबत संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. यानंतर आगे यांनी बेजबाबदारपणे त्वरित हा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. जिल्हा कारागृहाचे प्रमुख म्हणून याची माहिती देणे अधीक्षक आगे यांची जबाबदारी आहे. मात्र, ती झटकून देऊन आगे यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - चिमूर येथे पडक्या वास्तूमध्ये महिलांचे लसीकरण; प्रशासनाचे दुर्लक्ष, जीवितहानीची शक्यता