चंद्रपूर - हिराईनगर येथील नागरिकांनी पुन्हा एकदा मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात वीज, पाणी, रस्ते अशा कोणत्याही सुविधा नाहीत. यासाठी शासनाला विनंत्या करूनही कोणतीही उपाययोजना करण्यात शासनाने पुढाकार घेतला नसून,गावकरी संतप्त आहेत. पदरी निराशाच पडल्याने आपण कोणालाही मतदान करणार नाही, अशी ठाम भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.
हेही वाचा - ..त्यामुळे आमचे उमेदवार आम्हीच ठरवणार, चंद्रपुरात बेरोजगार युवकांचा एल्गार
हिराई नगर परिसरात पूर्वी एक उद्योग होता. परंतु, तो बंद पडला आहे. ही जागा शासनाकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. मात्र, उद्योगच बंद पडल्याने येथील कामगारांनी या जागेवर वसाहत निर्माण केली आहे. या विरोधात उद्योगाच्या मालकाने न्यायालयात धाव घेतली. तेव्हा पासून ही जागा वादग्रस्त आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांना शासनाने कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांची देखील येथे वानवा असून, शासकीय योजनांचा लाभ या नागरिकांना मिळत नाही.
सध्या ही सर्व कुटुंबे मोलमजुरी करून जगतात. त्यांच्या समस्येकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. निवडणुकीत नेते येतात आणि आश्वासने देतात. मात्र, पुढे येथील समस्यांकडे ढुंकूनही बघत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळेच हिराईनगर वासीयांनी टोकाची भूमिका घेतली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बहिष्कार टाकला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ते मतदान न करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
हेही वाचा - बल्लारपूर मतदारसंघातून विश्वास झाडेंच्या उमेदवारीला स्थानिकांचा विरोध, बैठकीतून केला 'वॉक आउट'
एकीकडे शहराचा विकास केल्याचा दावा केला जातो; तर याच शहरातील हिराईनगरवासीयांना बऱ्याच काळापासून मुलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. मतदानाच्या प्रक्रियेत सर्व सहभागी असणे गरजेचे आहे.परंतु, हिराईनगर येथील नागरिकांनी घेतलेली भूमिका लोकशाहीसाठी दु:खद आहे.