चंद्रपूर - वारंवार सांगून देखील अजूनही बरेच जण तोंडावर मास्क न घालताच सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत. यावर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी वेगळी शक्कल लढवली आहे. जे लोक मास्क लावणार नाही, अशा लोकांकडून दोनशे रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तर सोबतच तीन मास्क देखील फ्री देण्यात येणार आहे. दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा करण्यात येणार आहे.
नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील 193 प्रकरणात एकूण 11 लाख 37 हजार 970 रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये 58 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर 701 वाहने जप्त केली आहेत. प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
कोटा येथील मुलांसाठी हेल्पलाईन-
राजस्थान येथील कोटा या शहरात विविध अभ्यासक्रमासाठी गेलेल्या चंद्रपूर येथील मुलांना परत आणण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक लोकांनी विनंती केली आहे. जिल्हा प्रशासन या मुलांना परत आणण्याबाबत राज्य शासनाकडून परवानगी घेत आहे. यासंदर्भात अनेक मुलांसोबत जिल्हा प्रशासनाकडूनही संपर्क झालेला आहे. तथापि, कोटा येथून मुलांना परत आणताना जिल्ह्यातील सर्व मुलांना एकत्रित आणता यावे, यासाठी सर्व मुलांची यादी गोळा करणे सुरू आहे. ज्यांची मुले कोटा येथे अभ्यासक्रमासाठी असतील त्यांनी कार्यालयीन वेळेत ०७१७२-२५०६५९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार संजय राईंचवार यांनी केले आहे.
शेल्टर होममधील मजुरांना रोजगार -
सध्या जिल्ह्यात मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, छत्तीसगड आदी विविध भागातील मजूर मोठ्या प्रमाणात शेल्टर होममध्ये थांबले आहे. या सर्वांना आपल्या घराकडे जाण्याची ओढ आहे. मात्र पुढील 3 मेपर्यंत शासनाने आंतरजिल्हा, आंतरराज्य जाणे-येणे बंद केलेले आहे. त्यामुळे या मजुरांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, या काळात देखील त्यांना रोजगार मिळावा म्हणून स्थानिक ठिकाणी आवश्यक ते सामाजिक अंतर व सुरक्षितता पाडून काम देण्याचा प्रस्ताव शासनाने त्यांच्या पुढे ठेवला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये शासनाच्या शेल्टर होम मध्ये 794 विविध बांधकाम ठेकेदाराकडे 6 हजार 386, गोसेखुर्द सारख्या मोठ्या प्रकल्पावर 1203 अशा एकूण 8383 मजुरांची संख्या आहे.