चंद्रपूर : कोरोना संकटाच्या सावटाखाली पार पडलेल्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये या वेळेस अनेक नव्या तरूण चेहऱ्यांना संधी मिळाली. चंद्रपुरातही नव्या दमाच्या युवकांना जनतेने संधी देत ग्रामपंचायतीवर निवडून दिले. विशेष म्हणजे यापैकी बरेच युवक हे कसलिही राजकीय पार्श्वभूमी नसलेले आहेत. त्यामुळे ही नव्या बदलांची नांदी ग्रामविकासासाठी प्रोत्साहन देणारी ठरेल अशी आशा आता व्यक्त होताना दिसत आहे.
चंद्रपुरात पार पडलेल्या 609 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक गावातील नागरिकांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. नव्या दमाच्या तरूणांकडून गावात विकासाचे वारे वाहतील अशी अपेक्षा ठेवत ग्रामस्थांनी सुशिक्षित खांद्यांवर गावाची जबाबदारी टाकली. यात मूल तालुक्यातील चिचाळा, चंद्रपूर तालुक्यातील वेंढली, पिपरी, भद्रावती तालुक्यातील मुधोली आणि वरोरा तालुक्यातील वडधा अशा गावांची नावे घेता येतील. या गावातील नागरिकांनी अतिसामान्य घरातील उच्च शिक्षित युवकांवर आपला विश्वास टाकत त्यांना ग्रामपंचायतीवर निवडून दिले आहे. आता ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी या युवकांवर आहे.
हे आहेत परिवर्तनाचे मानकरी
सूरज चलाख : चिचाळा-कवडपेठ ग्रामपंचायत
मूल तालुक्यातील चिचाळा गावातील होतकरू युवक सूरज बंडू चलाख हा गडचिरोली येथे एका खासगी शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायचा. मात्र, कोरोनाच्या संकटात शाळा बंद झाल्या. त्यामुळे पगार मिळणेही बंद झाले आणि सूरजला गावी परतावे लागले. परतल्यानंतर गावातला भकासपणा त्याला प्रकर्षाने जाणवायला लागला. मुलभूत सोयीसुविधांपासून गावातील नागरिक वंचित होते. आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करावे हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. ही कळकळ त्याने अनेकांना बोलून दाखवली. याच दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले. नेहमी दूषणे देत बसण्यापेक्षा काहीतरी ठोस करण्याची संधी चालून आली आणि त्याने यात उतरण्याचे ठरविले. गावकऱ्यांनीही प्रोत्साहन दिले आणि ग्रामपंचायतीच्या 11 पैकी 9 जागांवर सूरजच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
सोमेश्वर पेंदाम : मुधोली ग्रामपंचायत
सामाजिक कार्य या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला सोमेश्वर पेंदाम हा गावातील धडपड्या युवक. कोरोनाच्या काळात गावकऱ्यांच्या मदतीला तो धावून गेला. त्यांना काय हवं नको याची काळजी त्याने घेतली. शाळा बंद झाल्याने मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्याने मोफत शिकवणी वर्ग सुरु केले. उरलेल्या वेळात तो बांबूच्या टोपल्या शिवण्याचे काम करायचा जे आताही सुरू आहे. भद्रावती तालुक्यातील मुधोली हे गाव ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर झोन मध्ये येते. आजूबाजूला घनदाट जंगल त्यामुळे येथे बांबूही मुबलक प्रमाणात असतो. सकाळी जंगलात जाऊन बांबू तोडून आणायचा आणि त्यापासून टोपल्या तयार करून आपला उदरनिर्वाह करायचा. दरम्यान नागरिकांशी भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाऊन घ्यायच्या, त्या सोडवायचा असा सोमेश्वरचा दिनक्रम. ग्रामपंचायतीच्या निवडणूक आल्या आणि गावकऱ्यांनीच सोमेश्वरचे नाव समोर केले. सोमेश्वरनेही होकार दिला. राजकीय पॅनलच्या विरोधात त्याचे पॅनल उभे ठाकले आणि 9 पैकी 6 उमेदवार निवडून देऊन गावकऱ्यांनी सोमेश्वरवर विश्वास टाकला.
ज्योती पोयाम : वडधा ग्रामपंचायत
वडधा ग्रामपंचायतीवर प्रथमच अराजकीय पॅनेलने विजय मिळवला आणि तोही पूर्ण बहुमताने. सात पैकी सातही जागा या पॅनलला मिळाल्या. यापैकी पाच सदस्यांची तर ही पहिलीच निवडणूक होती. यातील ज्योती पोयाम या महिलेचा संघर्ष जाणून घेण्यासारखा आहे. ज्योती ह्या शेतमजूर आहेत. मुलगा अवघ्या एक वर्षाचा आहे. अशा परिस्थितीतही त्यांनी प्रचार केला. लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. त्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काय करता येईल याचे नियोजन केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि गावकऱ्यांनी सर्व उमेदवारांना निवडून देऊन मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली.
भुवन चिने : पिपरी ग्रामपंचायत
चंद्रपूर तालुक्यातील पिपरी गावात शैक्षणिक उदासीनता आहे. काही युवकांनीच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यापैकीच एक म्हणजे भुवन चिने हा उद्योगी युवक. त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर तो व्यवसायाकडे वळला. सिमेंटचे पोल आणि जिनिंगच्या व्यवस्थापनाचे काम करत तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. घुग्गूस-चंद्रपूर महामार्गावर वसलेल्या या गावात मूलभूत सुविधांची वानवा आहे. ही स्थिती बदलण्यासाठी भुवनने पुढाकार घेतला. ग्रामपंचायत निवडणुकीत त्याच्या पॅनलने 9 पैकी 6 जागांवर विजय मिळाला. आता गावाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी त्याला मिळाली आहे.
राजकुमार नागपूरे : वेंढली ग्रामपंचायत
राजकुमार नागपूरे याने कला शाखेत पदवी घेतल्यावर डीएड केले. मात्र, शिक्षकाची नोकरी मिळाली नाही. मात्र निराश न होता त्याने सेंद्रिय शेतीकडे आपले लक्ष घातले. त्यात त्याला उल्लेखनीय यश आले. आता त्याच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या पालेभाज्यांना चंद्रपुरात चांगली मागणी आहे. राजकुमारचे हे कार्य संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या याच कार्यकर्तृत्वावर गावकऱ्यांनी विश्वास ठेवला. त्याच्या पॅनेलने 9 पैकी 6 जागांवर विजय मिळवला.